Heartbreaking News: प्राण्यांवरील अतोनात प्रेम कधीकधी मानवी मनावर किती खोलवर परिणाम करू शकते, याचे एक हृदयद्रावक उदाहरण समोर आले आहे. आपल्या लाडक्या मुक्या प्राण्याच्या आजारपणाचे दुःख सहन न झाल्यामुळे दोन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, केवळ एका पाळीव कुत्र्याच्या आजारपणामुळे कुणी स्वतःचे आयुष्य संपवू शकते का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.राधा सिंह आणि जिया सिंह अशी या दुर्दैवी बहिणींची नावे आहेत. एका पाळीव प्राण्याच्या प्रेमापोटी दोन तरुण मुलींनी आपले आयुष्य संपवल्याने लखनऊ शहरात या घटनेची मोठी चर्चा होत आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही बहिणी आपल्या पाळीव कुत्र्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. तो कुत्रा गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजारी होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणींनी कुत्र्यावर खूप उपचार केले, परंतु त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती.
( नक्की वाचा : Pune News : शाळेच्या वॉशरुमध्ये मैत्रिणीला गाठलं.. तर शिक्षिकेला केले प्रपोज, विद्यार्थिनीच्या प्रतापाने पुणे हादरले )
आपला लाडका सोबती बरा होत नसल्याचे पाहून या दोघीही प्रचंड तणावाखाली होत्या. कुत्र्याच्या या वेदना त्यांना पाहवत नव्हत्या आणि त्यातूनच त्यांनी हे भयंकर पाऊल उचलले असावे, असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा घरात इतर कुणीही उपस्थित नव्हते. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्या आईने, गुलाब देवी यांनी, त्यांना दुकानातून काही सामान आणण्यासाठी पाठवले होते. दुकानातून परतल्यानंतर दोन्ही बहिणींनी आपण फिनायल प्यायल्याचे आईला सांगितले. हे ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने आपल्या मुलाला याबद्दल माहिती दिली आणि दोघींनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
उपचारादरम्यान गमावला जीव
दोन्ही बहिणींना सुरुवातीला राणी लक्ष्मीबाई रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले. तिथे डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली असता राधा सिंह हिला मृत घोषित करण्यात आले. दुसरी बहीण जिया सिंह हिच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने तिनेही प्राण गमावले. दोन्ही बहिणी पदवीधर होत्या, मात्र मानसिक आरोग्याशी त्यांचा लढा बराच जुना होता.
( नक्की वाचा : VIDEO: 'तुझं आयुष्य बरबाद करेन..', थारमधून उतरला अन् मुलीला सपासप थप्पड मारल्या; पाहा थरकाप उडवणारा राडा )
मानसिक आरोग्याचा जुना इतिहास
पोलिस तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दोन्ही बहिणी 2014 पासून नैराश्याचा सामना करत होत्या. त्यांच्यावर याबाबतचे उपचारही सुरू होते. पाळीव कुत्र्याच्या आजारपणामुळे त्यांचे हे नैराश्य अधिक गडद झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |