मंगेश जोशी, प्रतिनिधी
हाय प्रोफाईल पद्धतीने घरफोडी करणारा आंतरराष्ट्रीय हाय प्रोफाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून या चोरट्याचे अनेक चक्रावणारे कारनामे पोलीस तपासात समोर आले आहेत. प्रशांत करोशी असं या हाय प्रोफाईल चोरट्याचं नाव असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मधला रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक यासह अन्य राज्यांमध्ये या आरोपीविरोधात 50 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असून भडगावमध्ये ही या चोरट्याने घरफोडी करून दहा लाख रुपयांपेक्षा अधिक सोन्या चांदीचे दागिने लंपास केली होते.
याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात या हाय प्रोफाईल चोरट्याचा तपास करत असताना अशाच घरफोडीच्या एका गुन्ह्यात हा चोरटा वर्धा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती भडगाव पोलिसांना मिळाली. यावरून भडगाव पोलिसांनी या चोरट्यास वर्धा पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. तर या चोरट्याकडून सुमारे आठ लाखाचे चोरी केलेले सोने देखील पोलिसांनी जप्त केले आहे.
नक्की वाचा - New Criminal Laws: देशभरात 3 नवीन फौजदारी कायदे लागू, जाणून घ्या प्रत्येक मुद्दा
हाय प्रोफाईल चोरट्याचे चक्रावणारे कारनामे
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात राहणारा प्रशांत याला हाय प्रोफाईल राहण्याची हौस आहे. यातूनच त्याने चोरीचा मार्ग निवडला. त्यातही कमी श्रमात जास्त पैसा मिळावा म्हणून या चोरट्याने घरफोड्या सुरू केल्या. विशेष म्हणजे घरफोडया करून चोरलेल्या दागिन्यांमधून चांदीचे दागिने हा चोरटा फेकून द्यायचा व सोन्याचे दागिने आपल्या सोबत घेऊन जायचा. हेच चोरीचे सोने अन्य राज्यांमध्ये विकून त्याच पैशावर जीवाची मुंबई करायचा. चोरीच्या सोन्यातून चांगला पैसा मिळायला लागल्याने या पठ्ठ्याने मुंबईसह दिल्ली, गोवा, बंगळुरू अशा मोठ्या शहरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी फाइव स्टार हॉटेलमध्ये राहुन मौजमजा करायचा. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये या चोरट्याने 50 पेक्षा अधिक घरफोड्या केल्या मात्र तरी देखील तो पोलिसांच्या हाती लागला नाही. कारण घरफोडी करण्याअगोदर आपलं लोकेशन मिळू नये म्हणून आपला मोबाईल 100 किलोमीटर अंतरावर बंद करायचा. ही सर्व माहिती पोलीस तपासात समोर आली असून चोरीच्या पैशावर मौजमजा करणारा हा हाय प्रोफाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात फसला आहे. त्याच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दृष्टीने पोलीस या चोरट्याची कसून चौकशी करत आहे