- मनोज सातवी, प्रतिनिधी
Illegal liquor News: पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेमुळे मृत्यूंची संख्या 26 वर पोहोचल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. या भीषण घटनेनंतर राज्यभरात अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांकडून कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणून वसईच्या नायगाव पोलिसांनी मालजीपाडा जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीवर धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी ही अवैध दारू भट्टी थेट जाळून उद्ध्वस्त केली असून तब्बल 16 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जंगलात छापा आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त| Raid in the Forest and Seizure of Lakhs worth of Materials
नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला (Crime Detection Team) मालजीपाडा जंगलात अवैध दारू भट्टी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलात शोधमोहीम राबवून छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 2,800 लिटर तयार गावठी दारू, 3,240 लिटर गुळाचा वॉश, दारू साठवण्यासाठी वापरण्यात येणारे मोठे ड्रम, डोल आणि दारू निर्मितीचे इतर साहित्य जप्त केले. या सर्व साहित्याची एकूण किंमत 16 लाख 57 हजार रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी हा संपूर्ण बेकायदेशीर साठा घटनास्थळीच नष्ट केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका| Aggressive Stance by Senior Officials
पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनेची पुनरावृत्ती वसई किंवा इतर भागात टाळण्यासाठी नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी अवैध हातभट्ट्या पूर्णपणे नष्ट करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी दारू माफियांविरोधात घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
(नक्की वाचा : Pune News: पुण्यात 'या' भागात गँगवार, सराईत गुन्हेगार विशाल काळेची गोळ्या झाडून हत्या)
दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल | Case Registered Under Prohibition Actया प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात 'महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम' (Maharashtra Prohibition Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील घटनेनंतर शासन आणि पोलीस प्रशासन आता अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कोणतीही गय करणार नसल्याचे या धडक कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.