प्रतिनिधी, देवा राखुंडे
इंदापूरमधील भीमा नदी पात्रात बोट बुडाल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 40 तासांनंतर सहावा मृतदेह सापडला असून तपासकार्य थांबवण्यात आले आहे. यापैकी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये दोन तरुणांचा समावेश आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या उजनी जलाशयात बोट पलटी होऊन सहा जणांचा मृत्यू झाला असून 40 तासांनंतर सहावा मृतदेह सापडला आहे. यामध्ये गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30 वर्षे ), कोमल गोकूळ जाधव (वय 25 वर्षे ), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय तीन वर्षे), अनुराग उर्फ गोल्या न्यानदेव अवघडे (वय 20), गौरव धनंजय डोंगरे (वय 25 वर्षे) या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनुराग अवघडे या बोट चालकाचाही समावेश आहे. दरम्यान अनुरागच्या मृत्यूनंतर त्याचा व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत आला आहे.
नक्की वाचा - बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या SDRF ची बोट बुडाली; 3 जवानांचा मृत्यू, दोघे बेपत्ता
करमाळा तालुक्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे एक बोट येत होती आणि वाऱ्याच्या प्रवाहापुढे बोट तग धरू शकली नाही आणि काही क्षणात बोट नदीत बुडाली. मात्र या घटनेनंतर बोट चालक असणारा गोल्या म्हणजेच अनुराज अवघडे याचा व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत आला आहे. गोल्याने 'जगा असं की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही सर्च केलं पाहिजे' अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं. आता हा स्टेटस खरा ठरला अशी भावना व्यक्त केली जात आहे. मंगळवारी 21 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर पुढील तब्बल 36 तास या सहा प्रवाशांचा तपास सुरू होता. यात गोल्याचाही शोध घेतला जात होता. यात गोल्यानं ठेवलेला स्टेटस जुळल्यामुळे गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.