Indore Baby Death Contaminated Water : एका चिमुकल्या जीवाचा असा अंत होईल, याची कल्पनाही त्या कुटुंबाने केली नव्हती. लग्नानंतर तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर घरामध्ये पाळणा हलला होता. आनंदाचे वातावरण होते, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आईच्या मायेची ऊब तर होती, पण एका नैसर्गिक कारणामुळे ती बाळाला स्वतःचे दूध पाजू शकत नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅकेटचे दूध सुरू करण्यात आले. मात्र, हेच दूध त्या चिमुकल्यासाठी काळ ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते.
एका विश्वासाने घेतलेल्या निर्णयाने संपूर्ण हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. ही हृदयद्रावक घटना ऐकल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. अवघ्या 5 महिने आणि 15 दिवसांच्या एका चिमुकल्याचा दूषित पाण्यामुळे जीव गेला आहे.
दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेला आनंद हिरावला
हे दुःखद प्रकरण मध्य प्रदेशातील इंदूर शहरात घडले आहे. येथील भगीरथपुरा भागात राहणाऱ्या सुनील साहू यांच्या घरी 8 जुलै रोजी मुलाचा जन्म झाला होता. मुलगी किंजल हिच्या जन्मानंतर 10 वर्षांनी अव्यानच्या रूपाने घरात मुलगा आला होता. सुनील एका खासगी कुरिअर कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
अव्यान पूर्णपणे निरोगी होता, त्याला कोणताही आजार नव्हता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्याला अचानक ताप आला आणि उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेले, औषधेही दिली, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर सोमवारी सकाळी रुग्णालयात नेत असतानाच या चिमुकल्याने जगाचा निरोप घेतला.
(नक्की वाचा : नवीन वर्षाचे 'स्वीट्स' खाऊ घालण्याच्या बहाण्याने बोलावले अन् थेट गुप्तांगावरच चालवला चाकू, मुंबईत खळबळ )
आईचे दूध आणि तो घातक पाण्याचा पेला
या घटनेमागील कारण अत्यंत वेदनादायी आहे. अव्यानच्या आईला दूध येत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला पॅकेटचे दूध देण्यास सांगितले होते. दूध जास्त घट्ट होऊ नये म्हणून त्यात नळाचे थोडे पाणी मिसळण्याचा सल्ला दिला होता.
कुटुंबाने घरातील नळाला येणारे नर्मदा नदीचे पाणी गाळून आणि तुरटी फिरवून स्वच्छ केले होते. त्यांना वाटले की हे पाणी सुरक्षित आहे. मात्र, त्याच भागातील पाणीपुरवठा दूषित झाला होता, ज्याची कल्पना या गरीब कुटुंबाला नव्हती. हेच दूषित पाणी दुधात मिसळून प्यायल्याने अव्यानला संसर्ग झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Akola News : जगायचं होतं सोबत, पण नशिबाने....अकोल्यातील शिक्षिका आणि ड्रायव्हरच्या प्रेमाचा असा झाला शेवट )
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक बळी
भगीरथपुरा हा परिसर सध्या भीषण संकटातून जात आहे. येथे केवळ अव्यानच नाही, तर दूषित पाण्यामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनील साहू सांगतात की, पाण्याचे नमुने खराब आहेत किंवा पाणी पिण्यायोग्य नाही, अशी कोणतीही सूचना प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती.
संपूर्ण मोहल्ला तेच पाणी वापरत होता. अव्यानची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी पाणी दूषित असल्याचे सांगितले. प्रशासनाच्या एका चुकीच्या माहितीने किंवा दिरंगाईने एका आईनं तिचा चिमुकला गमावला आहे.
घरात भयाण शांतता
आज त्या घरामध्ये फक्त शांतता आणि हुंदके ऐकू येत आहेत. अव्यानची आजी रडत रडत एकच वाक्य पुटपुटत आहे की, देवाने 10 वर्षांनंतर आनंद दिला आणि तो असा हिरावून घेतला. अव्यानची आई धक्क्यामुळे वारंवार बेशुद्ध पडत आहे, तर 10 वर्षांची मोठी बहीण किंजल शांत बसून आपल्या लहान भावाच्या आठवणीत हरवली आहे. स्वतःला स्वच्छ शहर म्हणवून घेणाऱ्या इंदूरमधील ही घटना व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. गरीब कुटुंबाने कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न आता अनुत्तरितच आहे.