अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याची पाकिस्तानने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की अमेरिकेचा हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ला करणे चुकीचे आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करणारा पाकिस्तान हा पहिला देश नाही. पाकिस्तान आधी सौदी अरेबिया, क्युबा आणि चिलीनेही या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर इंग्लंड आणि युरोपियन युनियनने अमेरिकेच्या या हल्ल्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं ही आरपारची लढाई सुरू झाल्याचं बोललं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंग्लंडने अमेरिकेला पाठिंबा देत म्हटले की जे काही केले आहे ते योग्य आहे. इंग्लंडने असे ही म्हटले आहे की इराणने चर्चेसाठी पुढे यायला पाहिजे. तर युरोपियन युनियनने अमेरिकेच्या हल्ल्याचे समर्थन करत म्हटले की इराणचा अणु कार्यक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे. शिवाय अणू कार्यक्रमासाठी इराणला परवानगी दिली जाऊ नये असे ही युरोपीयन युनियनने म्हटले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Iran Attacks Israel : इराणचा इस्त्रायलवर जोरदार प्रहार, 10 ठिकाणांवर हल्ला
पाकिस्तानने अमेरिकेचा निषेध केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एक दिवस आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार द्यावा, यासाठी अधिकृतपणे त्यांना नामांकित केले होते. पाकिस्तान सरकारने एक अधिकृत निवेदन जारी करून याची पुष्टी ही केली होती. त्यामुळे पाकिस्तानने आपले रंग कसे बदलले हे जगाला पाहाता आले आहे. एकीकडे अमेरिकेला चुचकारायचे तर दुसरीकडे त्यांचाच निषेध करायचा हे पाहायला मिळालं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले होते की अमेरिकेने इराणच्या तीन ठिकाणांवर हल्ला केला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैन्याच्या या हल्ल्यानंतर राष्ट्राला संबोधितही केले होते. या संबोधनात त्यांनी म्हटले होते की हा हल्ला आवश्यक होता. आम्हाला वाटते की आता इराणने शांततेसाठी पुढे यावे. तसेच ते म्हणाले की अमेरिकेने आज ते करून दाखवले जे कोणताही दुसरा देश कधी विचारही करू शकत नव्हता.