कॉलेजमध्ये केमिस्ट्रीसारखा क्लिष्ट विषय शिकवणाऱ्या एका ज्येष्ठ प्राध्यापिकेला, पतीच्या हत्येप्रकरणी स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्याची वेळ आली, तेव्हा तिने न्यायालयात असे वैज्ञानिक तर्क दिले की मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनीही आश्चर्यचकित होऊन विचारले, "तुम्ही प्राध्यापिका आहात का?" पण, 60 वर्षीय प्राध्यापिका ममता पाठक यांच्या या युक्तिवादांमुळे त्यांना शिक्षेपासून वाचवता आले नाही. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या खटल्यात, उच्च न्यायालयाने प्राध्यापिकेची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील छतरपूर येथील हे प्रकरण आहे. प्राध्यापिका ममता पाठक यांच्यावर आरोप होता की, त्यांनी 29 एप्रिल 2021 रोजी त्यांचे पती नीरज पाठक यांना आधी झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर विजेचा धक्का देऊन त्यांची हत्या केली. सरकारी डॉक्टर असलेले पती नीरज पाठक यांच्या हत्येनंतर प्राध्यापिका ममता पाठक त्यांच्या मुलाला घेऊन झांसीला निघून गेल्या.
सुरुवातीला, पोलिसांनी या प्रकरणाला साध्या विजेच्या धक्क्याने झालेला मृत्यू मानले होते. दरम्यान, नीरज पाठक यांची एक व्हॉईस रेकॉर्डिंग मिळाली, ज्यात त्यांनी आपल्या पत्नीवर छळ केल्याचा आरोप केला होता. प्राध्यापिका ममता पाठक यांनी कथितरित्या त्यांच्या ड्रायव्हरसमोर कबूल केले होते की त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली आहे. याच गोष्टीला आधार मानून पोलिसांनी जेव्हा सखोल तपास केला आणि फॉरेन्सिक तपासणी केली, तेव्हा हे प्रकरण हत्येचे असल्याचे निष्पन्न झाले. पती-पत्नीमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू असल्याचेही समोर आले.
( नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video )
सत्र न्यायालयाने सुनावली होती शिक्षा
यानंतर, सत्र न्यायालयात ममता पाठक यांच्यावर कटाने केलेल्या हत्येचा खटला चालवला गेला. सुनावणीनंतर जिल्हा न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांना शिक्षेचा आधार बनवले. यानंतर, ममताने मुलाच्या पालनपोषणासाठी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात जामिनाची मागणी केली. त्यांना जामीन मिळालाही. त्यांनी जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध जबलपूर उच्च न्यायालयात अपील केले.
न्यायालयात प्राध्यापिकेनं घेतला केमिस्ट्रीचा क्लास
उच्च न्यायालयात अपीलावर सुनावणीदरम्यान, ममता पाठक यांनी स्वतः युक्तिवाद केले. त्यांनी न्यायालयात सांगितले की, थर्मल बर्न (उष्णतेने भाजणे) आणि इलेक्ट्रिक बर्न (विजेच्या धक्क्याने भाजणे) यांच्यातील वैज्ञानिक फरक शवविच्छेदनादरम्यान शोधता येत नाही. त्यांनी सांगितले की, थर्मल बर्न आणि इलेक्ट्रिक बर्नच्या जखमा सारख्याच दिसतात. त्यांच्यातील फरक केवळ रासायनिक विश्लेषणानेच स्पष्ट होऊ शकतो.
प्राध्यापिका ममता पाठक यांनी न्यायालयात सविस्तरपणे सांगितले की, इलेक्ट्रिक करंट टिश्यूजशी कशी प्रतिक्रिया देतो आणि त्याचा कसा परिणाम होतो. त्यांनी हे प्रकरण इतक्या आत्मविश्वासाने समजावले की न्यायाधीशांनीही आश्चर्यचकित होऊन विचारले, "तुम्ही केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका आहात का?" या घटनेचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. अनेकांनी याला सध्याच्या काळातील बचाव पक्षाचा सर्वात अनोखा खटला म्हटले.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेक अग्रवाल आणि न्यायमूर्ती देवनारायण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर 60 वर्षीय ममता पाठक यांचे युक्तिवाद कामाला आले नाहीत. सरकारी वकील मानस मणि वर्मा यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, न्यायालयाने ममता पाठक यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता सुरेंद्र सिंह यांना न्यायमित्र म्हणून नियुक्त करून बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते.
उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आणि उपलब्ध तथ्ये विचारात घेऊन 97 पानांचा निकाल दिला. उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात प्राध्यापिका ममता पाठक यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आणि त्यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.