मंगेश जोशी
जळगाव जिल्ह्यातील पाळधी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी अहमदाबाद हावडा एक्सप्रेस खाली येऊन दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघे ही तरुण नात्याने मामा भाचे होते. ते एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांच्यात मित्रा सारखे नाते होते. या दोघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे लाईनवर मोबाईलवर रील बनवताना भरधाव एक्सप्रेसच्या खाली आल्याने या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मात्र रील बनवताना नव्हे तर कामासाठी जात असताना रेल्वे खाली आल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. दिवाळीच्या काळात या दुर्दैवी घटनेमुळे पाळधी गावावर शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबांवर दिवाळीच्या आनंदानंतर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जिल्ह्यातील पारधी गावातल्या महात्मा फुले नगर मधील प्रशांत पवन खैरनार व हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे या दोन तरुणांचा अहमदाबाद हावडा एक्सप्रेस खाली रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशांत व हर्षवर्धन हे दोघेही पाळधी गावातील महाविद्यालयात शिक्षण घेत होते. प्रशांत हा दहावीला तर हर्षवर्धन हा अकरावी वर्गात शिकत होता. नात्याने दोन्हीही मामा आणि भाचे असे यांचे नाते होते. मात्र सम वयाचे असल्याने दोघेही मित्र म्हणून वावरत असत. दिवाळीच्या सुट्टीमध्ये काही काम करून कुटुंबीयांना दिवाळीचे कपडे व भेटवस्तू द्याव्या यासाठी ते काम करत होते. रविवारी कामावर जात असताना रेल्वे लाईन ओलांडताना ते भरधाव एक्सप्रेस खाली आली.
घटनास्थळी अँड्रॉइड मोबाईल देखील आढळून आलेला आहे. मोबाईलमुळे रेल्वे लाईन वरून रेल्वे येत असल्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रशांत पवन खैरनार हा मूळचा मालेगाव येथील रहिवासी होता. प्रशांत तीन वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे दोन मुलांसह प्रशांतची आई आपल्या भावाकडे म्हणजेच प्रशांतचे मामा संतोष शिरसाळे व सतीश शिरसाळे यांच्याकडे राहायला आली. कालांतराने पाळधी गावातच भाड्याचे घर घेऊन त्या ठिकाणी प्रशांतची आई व त्याचा भाऊ हे वास्तव्यास होते. प्रशांतची आई दवाखान्यात साफसफाईचे काम करून आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण करत होती. प्रशांतलाही शिक्षण करून मोठा अधिकारी चांगल्या नोकरीला लागायचे होते. मात्र या घटनेमुळे प्रशांतच्या आईला व भावाला मोठा धक्का बसला आहे.
प्रशांतच्या अकाली जाण्याने त्याच्या मोठ्या भावालाही धक्का बसला आहे. वडिलांच्या जाण्यानंतर कुठेतरी आईच्या परिश्रमातून आपले स्वप्न साकार करण्यासाठी दोघेही भाऊ प्रयत्न करत असताना त्यातच प्रशांतचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने प्रशांतच्या मोठ्या भावाला मोठा धक्का बसला आहे. प्रशांत गेला हे अद्यापही त्याला मनाला न पटणारे आहे. त्यामुळे त्याच्या कंठातून शब्दही खूप जड झाले आहे. तर हर्षवर्धन महेंद्र ननावरे हा मूळचा पाळधी गावातील रहिवासी होता प्रशांतची आई ही नात्याने हर्षवर्धनची चुलत बहीण त्यामुळे प्रशांत व हर्षवर्धन यांचे नाते हे मामा भाचे होते. हर्षवर्धनचे वडील हे सफाई कामगार तर आई गृहिणी तसेच हर्षवर्धनला तीन बहिणी असून एक बहीण विवाहित तर एक घटस्फोटीत आहे. तिसरी बहीण ही अविवाहित आहे. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ हा भाऊबीजेच्या अवघ्या काही दिवसानंतर सोडून गेल्याने नन्नवरे कुटुंबांवरही मोठा आघात झाला आहे.