लक्ष्मण सोळुंके, जालना:
Jalna Crime: गेल्या काही दिवसांपासून राज्यात खून, मारामारी दरोड्याच्या घटनांचे सत्र सुरु आहे. जालन्यातून अशीच एक हादरवारी घटना समोर आली आहे. शहरातल्या घाटी रुग्णालय परिसरात 28 वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दुचाकीवर आलेल्या 2 ते 3 जणांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पाठलाग करुन गोळीबार.. तरुणाची निर्घृण हत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना शहरातील नूतन वसाहत भागात असलेल्या घाटी रुग्णालय परिसरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना समोर आली. दुचाकीवर आलेल्या दोन ते तीन जणांनी गोळीबार केला असून यामध्ये डोक्यात गोळी लागल्याने एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. चरण रायमलू असं या गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. जुन्या वादातून ही गोळीबाराची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आरोपी फरार आहे.
आईस्क्रिम विक्रेत्याचे अपहरण...
दुसरीकडे, जालन्यात आईस्क्रीम विक्री करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला झाडाला बांधून अमानुष मारहाण करत वीस हजारांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन अज्ञातांविरोधात तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना मंठा रोडवरील राममूर्ती फाट्याजवळ आईस्क्रीम विक्री करणाऱ्या तरुणाला तीन अज्ञात आरोपीने अपहरण करून अमानुषपणे मारहाण केली आहे.
या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या जालनातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मारहाण करतेवेळी या तरुणाच्या वडिलांना कॉल करून पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी देखील आरोपींनी केल्याचं तक्रारीत म्हटल. याप्रकरणी जालन्यातील तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.