Crime News : एका प्रेमप्रकरणाचा असा शेवट होईल याची कल्पना कुणीही केली नव्हती. प्रेम, लग्नाचे वचन, त्यानंतर झालेली फसवणूक आणि त्यातून मनात धगधगणारी सूडाची आग अशा फिल्मी वाटणाऱ्या पण थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका जिद्दी महिलेचा, जिने आपल्या कष्टाने स्वतःची ओळख निर्माण केली होती, तिचा शेवट तिच्याच पूर्वाश्रमीच्या पतीने अत्यंत क्रूरपणे केला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दिवशी या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्याच दिवशी या महिलेची हत्या झाली.
काय आहे प्रकरण?
आपलं आयुष्य रुळावर आणण्यासाठी धडपड करणाऱ्या या महिलेचा प्रवास 4 जानेवारीच्या रात्री रक्ताच्या थारोळ्यात संपला. ही महिला साधीसुधी नव्हती, तर तिने पुरुषी मक्तेदारी मोडीत काढत रस्त्यावर ऑटो चालवून आपली ओळख निर्माण केली होती. रात्रीच्या वेळी आपल्या रिक्षामधून जात असताना दबा धरून बसलेल्या आरोपीने तिच्यावर गोळ्या झाडल्या. तिचा रक्ताने माखलेला मृतदेह आणि उलटलेली रिक्षा पाहून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. झाशीच्या पहिल्या महिला ऑटो ड्रायव्हर अनिता चौधरी यांची त्यांच्याच पतीने हत्या केल्याचे आता उघड झाले आहे.
( नक्की वाचा : रेल्वेत भेटला तृतीयपंथीय, प्रेमात पडला आणि लग्नही झालं,पण... एका ट्विस्टनं सारंच संपलं )
सूडासाठी निवडली लग्नाची तारीख
झाशीच्या नवाबद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सकुनवा धुकवान कॉलनीजवळ ही घटना घडली. या हत्येचा तपास करताना पोलिसांसमोर अत्यंत विदारक सत्य समोर आले. मुख्य आरोपी मुकेश झा आणि अनिता यांचे 6 ते 7 वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. त्यांनी एका मंदिरात लग्नही केले होते, मात्र काही काळानंतर त्यांच्यात दुरावा आला आणि अनिता यांनी त्याला सोडले.
हा नकार मुकेशच्या जिव्हारी लागला होता. त्याला वाटले की अनिताने आपली फसवणूक केली आहे. याच रागातून त्याने अनिता यांचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने हत्येसाठी 4 जानेवारी हीच तारीख निवडली, कारण याच दिवशी त्यांचे लग्न झाले होते.
( नक्की वाचा : Shocking News: गिझरच्या गरम पाण्यामुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, बाथरुममध्ये झाली भयंकर दुर्घटना )
मध्यरात्री पोलीस चकमक
अनिता यांच्या पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुकेश झा, शिवम आणि मनोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. शिवम आणि मनोजला पोलिसांनी तत्काळ पकडले, पण मुकेश फरार झाला होता. 5 जानेवारीला त्याची कार एका पुलावर बेवारस अवस्थेत सापडली, ज्यामुळे तो नदीत उडी मारून पळाला असावा असा संशय व्यक्त झाला.
मात्र, 10 जानेवारीच्या मध्यरात्री पोलिसांनी त्याला भगवंतपुरा ते करगुआं दरम्यान घेरले. यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात मुकेशच्या पायाला गोळी लागली आणि त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.