अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना अटक केली होती. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात आली होती. या प्रकरणी या दोघांच्या विरोधात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी दोषारोप पत्र तयार केले. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी सकाळी ते दाखल ही करण्यात आले. 1006 पानांचे हे दोषारोप पत्र आहे. जलद गती न्यायालयात हा खटला चालविला जाणार आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे काम पाहणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणात पोलीसांकडे ठोस पुरावे सापडले आहेत. त्यात सीसीटीव्हीचा पुरावा आहे. शिवाय ज्या परिसरात अल्पवयीन मुलगी राहत होती, त्या परिसरातील सीसीटीव्ही ही पोलीसांच्या हाती लागले आहे. आरोपीने ज्या दारूच्या दुकानात दारू घेतली तिथले ही पुरावे हाती लागले आहेत. पोलिसांना साक्षीदार भेटले आहेत. विशाल गवळी यांने दारू विकत घेतली होती. त्या दुकानदाराने ही साक्ष दिली आहे. केमिकल पुरावे ही हाती लागले आहे. त्यामुळे आरोपीच्या भोवती फास आणखी आवळला आहे. त्याला सुटण्याचे सर्व मार्ग पोलिसांनी या दोषारोपपत्राच्या माध्यमातून बंद केले आहेत.
कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या 60 दिवसानंतर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. विशाल गवळी याने 23 डिसेंबर 2024 रोजी मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. पुढे तिची हत्या केली. या गुन्ह्यात विशालला त्याची पत्नी साक्षी हिने मदत केली होती. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात आधी साक्षी गवळीला अटक केली होती.
तिची चौकशी केल्यानंतर पुढे बुलढाणा येथील शेगावमधून एका सलूनच्या दुकानात आरोपी विशाल गवळीला अटक करण्यात आली. मुलीच्या मृत्यूनंतर विशाल आणि साक्षी या दोघांनी मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. या प्रकरणात तांत्रिक दृष्ट्या सर्व पुरावे जमा केले. मुलीचे अपहरण ते तिचा मृतदेह फेकून दिल्या प्रकरणचे सीसीटीव्ही पुरावे पोलिसांकडे आहेत. या प्रकरणात विशालची पत्नी साक्षी ही विशालच्या विरोधात साक्ष देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डीसीपी अतुल झेंडे, कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे, या प्रकरणाचे तपास अधिकारी गणेश न्यायदे यांनी दोषारोपपत्र दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.