दिल्लीतील निर्भया हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना कल्याणमध्ये घडली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल गवळी नावाच्या आरोपीने एका अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर भयंकर रितीने अत्याचार केले. यानंतर तिने सदर प्रकरणाची कुठे वाच्यता करू नये यासाठी तिचा निर्घृणपणे खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेह एका बॅगेमध्ये कोंबून ठेवला. गुंड प्रवृत्तीच्या विशाल गवळीने तो राहात असलेल्या परिसरात दहशत निर्माण केली होती. रिक्षाचालक असलेल्या विशाल गवळी याच्याविरोधात विनयभंगाचा 5 गुन्हे दाखल आहेत.
अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीचा खात्मा करा!
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या विशाल गवळी याच्याविरोधात विनयभंगाचे गुन्हे दाखल असताना पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई का केली नाही असा सवाल कल्याणमधील महिलांनी विचारला आहे. सदर घटनेने फक्त कल्याणच नाही संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलीस नेमकं करतात तरी काय असा प्रश्न नागरीक विचारू लागले असून आता त्यांनी विशाल गवळीसारख्या विकृतींना कायमचे ठेचण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. NDTV मराठीशी बोलताना कल्याणमधील महिलांनी म्हटले की, अक्षय शिंदे, विशाल गवळी अशी माणसे ही समाजाला लागलेला शाप आहे. या महिलांनी विशाल गवळीचा एन्काऊन्टर करण्याची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बायकोनेही दिली साथ
विशाल गवळी याच्या या राक्षसी कृत्यानंतर चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याची बायको साक्षी हिनेदेखील मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. खासगी बँकेत काम करणारी साक्षी जेव्हा घरी आली तेव्हा विशालने घडलेला प्रकार तिला सांगितला. यानंतर दोघांनी बसून मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा कट रचला. दोघांनी मिळून रक्त पुसले, विशालने मित्राची रिक्षा बोलावली ज्यातून विशाल आणि साक्षीने बॅगेत भरलेला मुलीचा मृतदेह बापगावला नेला. तिथे मृतदेह फेकून दिला आणि दोघे घरी आले. यानंतर विशालने दारू ढोसली आमि तो शेगावला पळून गेला. घराजवळ रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांचा विशालवर संशय बळावला होता. त्यांनी साक्षीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.
नक्की वाचा :कल्याण अल्पवयीन मुलीचं हत्या प्रकरण; आरोपीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा ऐकून पोलीसही चक्रावले
कल्याण पोलीस शेगांवला पोहोचले
विशाल गवळी याला शेगाव पोलिसांनी अटक केली होती. विशालचा ताबा मिळवण्यासाठी कल्याण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शेगावला पोहोचले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशालला कल्याणला आणण्यात येणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आश्वासन दिले की आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल आणि आरोपीला फाशी व्हावी यासाठी सरकारच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले जातील.