अमजद खान
लग्नाच्या हळदी सभारंभात मै हूँ डॉन या गाण्यावर नाचताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तो गाण्यावर नाचला म्हणून हा व्हिडीओ व्हायरल होत नाही. तर तो त्यावेळी हातात चक्क बंदूक घेऊन नाचत होता. ही घटना कल्याण पश्चिमेला घटली आहे. तर चिंतामण लोखंडी असं या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चिंतामण लोखंडे हे भाजपा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आहेत. ते कल्याण पश्चिमेला असलेल्या उंबर्डे गावात राहाता. ते व्यवसायिक ही आहेत. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात एका लग्नाचा हळदी सभारंभ होती. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक जमले होते. त्यावेळी स्टेजवर ऑर्केस्ट्रा सुरु होता. गायकाने मै हूँ डॉन हे गाणं गायला सुरुवात केली. हे गाणे सुरु असताना या गावातील व्यावसायिक आणि भाजपचे पदाधिकारी चिंतामणी लोखंडे यांनी गाण्यावर नृत्य सुरु केले.
नाचत असताना त्यांनी त्यांच्याजवळ असलेली रिव्हाल्वर बाहेर काढली. त्यानंतर त्यांनी ती रिव्होलवर हवेत उंचावत नाचविली. हा हळदीचा कार्यक्रम यू ट्यूबवर लाईव्ह होत होता. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला . या प्रकरणी कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.या प्रकरणात चौकशी करुन कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. सुरक्षेसाठी घेतलेलं रिव्हाल्वरचा शो करण्यासाठी वापर केला जातो, हे अतिशय धक्कादायक आहे असं ते म्हणाले.
या घटनेमुळे एकच चर्चा रंगली आहे. दोन वर्षापूर्वी अशाच एका हळदी सभारंभात कल्याण पूर्वेतील मोठया व्यावसायिकाच्या कुटुंबितील चार जणांनी हवेत गोळीबार केला होता. त्यावेळी तत्कालीन डीसीपी सचिन गुंजाळ यांनी गोळीबार करणाऱ्या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याना अटक करुन त्यांचा शस्त्र परवाना रद्द केला होता. आता या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या पदाधिकाऱ्याला अटक करून त्याचा परवाना रद्द करणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.