Ranya Rao Case : दुबईमधून सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात कन्नड सिनेमातील 'मोना' (कन्नड अभिनेता रान्या राव) ने DRI समोर अनेक गौप्यस्फोट केले आहेत. रान्यानं तस्करी करण्याची पद्धत कशी शिकली हे देखील DRI ला सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्यानं तिच्या जबानीमध्ये सांगितलं की, ती फोटोग्राफी आणि रियल इस्टेट बिझनेसच्या निमित्तानं दुबईमध्ये जात असे. आपण फक्त दुबईमध्येच नाही तर युरोप, अमेरिका आणि पश्चिम आशियाई देशांचाही दौरा केला आहे, असंही रान्यानं या जबानीत सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुठं शिकली तस्करी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या रावनं पोलिसांना ती तस्करी कशी शिकली हे देखील सांगितलं. सुरक्षा एजन्सीच्या कचाट्यातून कसं निसटायचं हे यूट्यूबवर सर्च केले होते. त्याचबरोबर सोनं कसं लपवायचं हे देखील यूट्यूबवरुनच शिकले होते.
रान्या रावनं पुढं सांगितलं की, 'तिला दुबई विमानतळावरील टर्मिनल 3 च्या गेटनं जाण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर बेंगळुरुमध्ये सोने डिलिव्हर करण्याची सूचना दिली होती. आपण पहिल्यांदाच दुबईमधून सोन्याची तस्करी केली होती. यापूर्वी असं कधीही केलं नव्हतं, असं रान्यानं सांगितलं. त्याचबरोबर आपण अनेकदा दुबईला गेलो होतो असंही तिने सांगितलं. आपल्याला ही सूचना कुणी दिली होती त्या व्यक्तीचं नाव रान्यानं सांगितलं नव्हतं.
( नक्की वाचा : Ranya Rao : वडील IPS, स्वत: अभिनेत्री, विमानतळावर 14 किलो सोन्यासह अटक, वाचा कोण आहे रान्या राव? )
'सोन्याची छडी देऊन निघून गेला'
या चौकशीच्या दरम्यान रान्या रावनं सांगितलं की, 'मला ज्या व्यक्तीनं विमानतळावर भेटायला बोलावलं होतं त्याची बोलण्याची पद्धत विदेशी व्यक्तीसारखी होती. मी पांढऱ्या गाऊनमध्ये विमानतळावर भेटेन असं त्या व्यक्तीनं सांगितलं होतं. आम्ही विमानतळावर भेटलो. सुरक्षा तपासणीतून बाहेर पडल्यानंतर त्यानं मला सोन्याची छडी दिली त्यानंतर तो तिथून निघून गेला. '
टॉयलेटमध्ये लपवलं सोनं
मला प्लॅस्टिकच्या दोन पाकिटात सोनं देण्यात आलं होतं. मी ते विमानतळावरच फाडलं. त्यानंतर विमानतळावरील टॉयलेटमध्ये जाऊन ते सोनं स्वत:च्या शरिराला चिकटवलं. मी ती सोन्याची छडी माझ्या जिन्समध्ये तसंच बुटांमध्ये लपवली होती,' असं ती म्हणाली.