Shocking Video : राजकीय नेत्यांच्या दादागिरीचे प्रकार काही नवे नाहीत. भर कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी किंवा अन्य प्रसंगामध्येही काही नेते राजकीय वर्चस्वाच्या जोरावर दादागिरी करत असतात. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो)च्या एका नेत्याच्या गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. सचेंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या रामलीला कार्यक्रमात डान्सरवर पैसे उधळले. इतकंच नाही तर विरोध केल्यावर पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार उघड होताच पोलिसांनी आरोपी नेता अमितेश शुक्ला याला अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा 52 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
नेमकं काय घडलं?
भौंती गावात रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाशी संबंधित अमितेश शुक्ला या कार्यक्रमाला पोहोचला होता. आरोप आहे की, कार्यक्रम सुरू असताना अमितेश शुक्लाने कलाकारांवर आणि नृत्य करणाऱ्या डान्सरवर भर रस्त्यात पैसे उधळायला सुरुवात केली. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये मशिदीबाहेर तुफान राडा; नमाज पठणावरून दोन गट भिडले! 'हे' होतं कारण )
रामलीला समितीचे सदस्य आणि आयोजकांनी अमितेश शुक्लाच्या या वागणुकीवर आक्षेप घेतल्यावर तो संतप्त झाला. वाद वाढल्यावर या नेत्याने आपल्या कमरेतून पिस्तूल काढले आणि समितीच्या एका सदस्याच्या पोटावर लावले.
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आरोपी त्या व्यक्तीला धमकावत आणि ओरडून सांगत आहे की, "चटकन गोळी मारेन, कोणी वाचवू शकणार नाही.'' या घटनेमुळे रामलीला पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
व्हायरल व्हिडिओनंतर कारवाई
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल होताच पोलीस प्रशासन सक्रिय झाले. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेतली. एडीसीपी कपिल देव यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी धाड टाकून आरोपी अमितेश शुक्ला याला पिस्तुलासहित अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची चौकशी सुरू असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. अमितेश शुक्लाचे भाजपचे आमदार महेश त्रिवेदी यांच्यासोबतचे फोटो देखील समोर आले आहेत.