
Kalyan News: कल्याण पूर्व येथील आनंदवाडी परिसरात शुक्रवारी जुम्माच्या नमाज पठणादरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. मशीदीसमोर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना पोलिसांसमोरच घडल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असून, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमके काय घडले?
आनंदवाडी परिसरातील एका मोठ्या मशीदीत जुम्माच्या नमाजसाठी मोठ्या संख्येने मुस्लीम नागरिक जमले होते. गर्दी जास्त असल्यामुळे मशीद प्रशासनाने दोन टप्प्यात नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या टप्प्यातील नमाज पूर्ण झाल्यावर लोक बाहेर येत असताना, दुसऱ्या टप्प्याची नमाज सुरू होणार होती. याच दरम्यान, एका तरुणाने दुसऱ्या व्यक्तीला 'माझ्या भावाला आत का घेतले नाही?' आणि 'गेट का बंद केले?' असा जाब विचारला. या किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला आणि याचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले.
( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )
पोलिसांसमोर राडा
मशीदीबाहेर झालेल्या या तुफान राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दोन गट एकमेकांना मारहाण करत आहेत आणि पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र वाद सुरूच आहे.
कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद सूरज खान आणि दस्तगीर खान या दोन व्यक्तींमध्ये झाला. या दोघांचीही एकमेकांविरोधात तक्रार आहे. पोलिसांनी या दोघांनाही वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहे. या दोघांच्या विरोधातही कायदेशीर कारवाई (Legal action) केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world