Love Story : लग्नानंतरही पती किंवा पत्नी पूर्वीच्या प्रियकराला न विसरल्याची प्रकरणं अनेकदा उघड झाली आहेत. यापैकी अपवादात्मक प्रकरणात सुखानं शेवट होतो. पण, अनेकदा असं काही घडतं की जोडीदाराच्या पायाखालाची जमीन सरकते. ज्याच्यावर विश्वास ठेवून आपण सात जन्माची स्वप्न रंगवली ती व्यक्ती आपली फसवणूक करत होती, हे पचवणं अवघड असतं. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधून या प्रकारचं एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एक विवाहित महिला घरातील सर्व सामान घेऊन शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत पळून गेली.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती गंगास्नानासाठी गेला होता. या संधीचा फायदा घेत महिलेने घरातील दागिने आणि पैसे घेतले आणि प्रियकरासोबत पळून गेली. ही घटना शिवराजपूरची आहे. पतीने पत्नीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. कानपूर पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अजून तरी गुन्हा दाखल झालेला नाही. अजय सिंग असे या प्रकरणातील पीडित पतीचे नाव आहे. त्यानं आरोप केलाय की, त्याची पत्नी संगीताला दीपक नावाच्या तरुणाने पळवून नेले आहे.
( नक्की वाचा : Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त! )
अजयने पोलिसांत तक्रार दाखल करताना सांगितले की, तो सोमवारी गंगास्नानासाठी गेला होता. याच वेळी, शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने संधी साधून त्याच्या पत्नीला फूस लावून आपल्या गाडीत बसवून पळवून नेले. पत्नीने घरात ठेवलेले 15 लाख रुपये रोख आणि दागिने तसेच त्यांच्या मुलालाही सोबत घेऊन गेल्याचा आरोप पतीने केला आहे.
पत्नीचा शोध सुरु
गंगास्नान करून परत आल्यावर पत्नी घरी नव्हती. आजूबाजूला चौकशी केल्यावर त्याला घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाली. पीडित पतीने आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी वरुण शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि शेजारील तरुणाच्या प्रेमसंबंधाचे प्रकरण समोर आले आहे. पोलीस महिला आणि आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.