Karuna Sharma vs Dhananjay Munde Case : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना 2 लाखांची पोटगी द्यावेत, असा निर्णय मुंबईतील माझगाव कोर्टानं कायम ठेवला आहे. यापूर्वी कौटुंबीक न्यायालयानं हा निर्णय दिला होता. त्याला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं, मुंडे यांची ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली. त्यानंतर बोलताना करुणा शर्मा यांनी हा सत्याचा विजय असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर मला प्रेमात पाडण्यासाठी 20 कोटींची ऑफर दिली होती, असा खळबळजनक आरोप देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाल्या करुणा शर्मा?
हा सत्याचा विजय आहे. आजचा निकाल महिलांसाठी ऐतिहासिक आहे. या निकालानं धनंजय मुंडे पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत, असं करुणा यांनी सांगितलं. महिलांनी ठरवलं तर ते कुणालाही हरवू शकता. पण, त्यासाठी तुम्ही खरे हवा. खरे असाल तर तुम्ही कुणाविरुद्ध लढू शकता. हा खटला संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
राज्यातील व्यवस्था इतकी खालावली आहे की महिला दहशतीमध्ये आहेत. मी त्या महिलांना संदेश देऊ इच्छिते की मी लढले तसं तुम्ही देखील लढा. न्याय मिळवा, असं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : 'मी धनंजय मुंडे स्वीकार करतो की...' करुणा शर्मा यांनी सादर केला लग्नाचा सर्वात मोठा पुरावा )
पहिली बायको असल्याचं दुसऱ्यांदा सिद्ध
खालच्या कोर्टानं मागणी फेटाळण्याची धनंजय मुंडे यांची फेटाळण्यात आली. मी पहिली बायको आहे, हे दुसऱ्यांदा सिद्ध झाले आहे. मी धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीसाठी, त्यांच्या घरासाठी 27 वर्ष दिली. त्यासाठी मला पोटगी हवी आहे, असं मी याचिकेत म्हंटलं होतं. हा माझा हक्क आहे, अशी मागणी मी केली होती. कोर्टानं मला हक्क दिला आहे, असं करुणा शर्मा यांनी सांगितलं.
20 कोटींची ऑफर
'माझ्या पाठीमागे तरुण मुलांना सोडण्यात आलं आहे. करुणा मुंडे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवा, तिच्याबरोबर लग्न करा असं त्यांना आमिष दाखवलं, त्यासाठी 20 कोटींची ऑफर देण्यात आली होती,' असा खळबळजनक आरोप करुणा यांनी केला.
माझ्याकडे त्याबाबतचा पुरावा आहे. वाल्मीक कराड आणि त्या व्यक्तीला जी ऑफर देण्यात आली होती त्याचा पुरावा माझ्याकडं आहे. आजपर्यंत मी गप्प होते. पण, माझ्याविरोधात रोज षडयंत्र सुरु आहे. धनंजय मुंडे यांची दलाल मंडळी हे षडयंत्र रचत आहेत. मी त्यानंतरही हरणार नाही.
धनंजय मुंडेविरोधात तोंड उघडलं, पुरावे सादर केले तर तुझ्या मुलीला उचलून नेऊ अशी धमकी देखील मला दिली होती, असा आरोपही करुणा शर्मा यांनी यावेळी केला.
धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल तेव्हा माझा मोठा विजय असेल, असंही त्यांनी सांगितलं.