Kerla Crime: 4 वर्षात 64 जणांकडून अत्याचार, 40 जणांची नावे कळाली; 6 जण अटकेत

पोलिसांनी एकाला पूर्वीच अटक केली होती. तरुणीने केलेल्या कथनानंतर आरोपींना पकडण्याची मोहीम वेगाने राबवण्यात येत असून आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

केरळ:  केरळमधील एका तरुणीने केलेल्या आरोपामुळे तिथे सध्या जबरदस्त खळबळ उडाली आहे. इथल्या पथनामथिट्टा जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या तरुणीने आरोप केला आहे की गेल्या 4 वर्षांमध्ये तिच्यावर 64 जणांनी लैंगिक अत्याचार केला आहे. जेव्हा अत्याचार झाला तेव्हा ही तरुणी अल्पवयीन होती आणि दोन महिन्यांपूर्वीच तिने वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला पूर्वीच अटक केली होती. तरुणीने केलेल्या कथनानंतर आरोपींना पकडण्याची मोहीम वेगाने राबवण्यात येत असून आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राजीव एन. हे केरळच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की पीडितेने या प्रकाराची वाच्यता सगळ्यात आधी शाळेच्या कऊन्सिलिंग सेशनमध्ये दिली होती. या सेशनमध्ये तिने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा पाढाच वाचला होता. हे ऐकून हादरलेल्या काऊन्सिलरने बाल कल्याण समितीशी संपर्क साधला.   बाल कल्याण समितीने पोलिसांत तक्रार नोंदवली. 

पीडिता ही खेळाडू असून तिच्यावर पथनामथिट्टा जिल्ह्यात विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार झाले असे तिने सांगितले आहे. स्पोर्टस कँपमध्येही तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तिचे म्हणणे आहे. पीडितेने आरोप केलेले बहुतांशजण हे क्रीडा प्रशिक्षक आहे, वर्गातील सहकारी आणि स्थानिक रहिवासी आहेत. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केलेत. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पथनामथिट्टा पोलीस अधीक्षक स्वत: या प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करत आहेत. 

(नक्की वाचा -  CIDCO Lottery : सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर, 25 लाखांपासून मिळणार स्वप्नांचं घर, अर्जाची अंतिम मुदत कधीपर्यंत?)

पीडितेकडे स्वत:चा मोबाईल नाहीये. ती रात्री तिच्या वडिलांचा मोबाईल वापरत होती. या मोबाईलवर तिने 40जणांची नावे आणि नंबर सेव्ह करून ठेवले होते. त्यामुळे या आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यास पोलिसांना मदत होत आहे. सदर प्रकार ऐकून हा अत्यंत धक्कादायक असल्याचे बाल कल्याण समितीचे म्हणणे आहे. बाल कल्याण समितीने पीडितेला मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठवले असून मानसोपचारतज्ज्ञ या मुलीची मानसिक अवस्था तपासणार असून तिने केलेले आरोप खरे आहेत अथवा नाही याची पडताळणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही वेगळी केस असल्याने आम्ही पोलीस अधीक्षकांना जातीने या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केल्याचे बाल कल्याण समितीने म्हटले आहे.

Advertisement