विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात माणुसकीला आणि गुरु-शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कागल तालुक्यातील एका आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या शिक्षकानेच असे कृत्य केल्याने पालकांचं टेन्शन वाढलंय.
काय आहे प्रकरण?
कागल तालुक्यातील एका आश्रम शाळेत कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय 55, रा. सावर्डेकर कॉलनी, मुरगूड) हा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. याच शाळेत पीडित मुलगी शिक्षण घेत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत मुख्याध्यापकाने या मुलीवर अत्याचार केले.
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने आणि मुलीने कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत संबंधित मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले आहे.
( नक्की वाचा : Techie Murder: 18 वर्षांचा मुलगा आणि इतकी क्रूरता? खिडकीतून घरात शिरला आणि महिला इंजिनिअरला...अंगावर येईल काटा )
मुलाच्या फ्लॅटवर नेऊन अत्याचार
पीडित मुलीची आई कामानिमित्त कोल्हापूर शहरात वास्तव्यास आहे. या संधीचा फायदा घेत मुख्याध्यापक दाभोळे याने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. एकदा त्याने मुलीच्या घरी जाऊन आई नसताना कृत्य केले, तर दुसऱ्यांदा त्याने आपल्या मुलाच्या फ्लॅटवर मुलीला बोलावून घेतले.
त्याचा मुलगा नोकरीनिमित्त बाहेर असल्याचा फायदा त्याने घेतला आणि तिथे मुलीवर अत्याचार केले. जानेवारी 2026 मध्ये मुलीच्या वागण्याबोलण्यात बदल जाणवू लागल्यानंतर आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा सर्व प्रकार उघड झाला.
( नक्की वाचा : Akola News : जगायचं होतं सोबत, पण नशिबाने....अकोल्यातील शिक्षिका आणि ड्रायव्हरच्या प्रेमाचा असा झाला शेवट )
या प्रकरणात पीडित मुलगी आणि तिच्या आईने कोल्हापूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. त्यानंतर महिला सहाय्य कक्षात मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी कृष्णा दाभोळे याला मुरगूड येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. सध्या शहर डीवायएसपी प्रिया पाटील या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.