विशाल पुजारी, कोल्हापूर:
Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात आज पहाटेच्या सुमारास माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हुपरीतल्या सूर्या कॉलनीमध्ये एका ४५ वर्षीय नराधम मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांची विळी, काच आणि लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जन्मदात्या माता-पित्याची हत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनील नारायण भोसले (वय ४५) असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. त्याने आपले वडील नारायण गणपतराव भोसले (वय ७५) आणि आई विजयमाला नारायण भोसले (वय ६५) यांच्यावर पहाटे पाचच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. घरात असलेल्या विळीने आणि लाकडी दांडक्याने त्याने आई-वडिलांच्या डोक्यावर वर्मी घाव घातले.
Sangli Crime: लग्नाची पहिलीच रात्र.. नवरीने केला असा विचित्र प्रताप, लग्नाळू तरुणाचा संसार उद्ध्वस्त
हा हल्ला इतका भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी झालेल्या आरडाओरड्याने शेजारी जागे झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विशेष म्हणजे, आपल्या जन्मदात्यांची हत्या केल्यानंतर आरोपी सुनील भोसले हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे.
मुलगा स्वतः पोलिसात हजर
प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वाद किंवा मानसिक नैराश्यातून हे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे, मात्र खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पाचारण करण्यात आली आहे. पोटच्या लेकराने जन्मदात्या माता-पित्याची अशी निर्घुण हत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.