विशाल पुजारी
जानेवारी फेब्रुवारीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. लग्नसराईसह समारंभ सध्या मोठ्या धुमधडाक्यात करण्याकडे लोकांचा कल आहे. मात्र याच समारंभाच्या आनंदावर विरझण घालण्याचे काम एका चोरट्यानं केलं आहे. कोल्हापुरात एका चोरट्यानं लग्नात पाहुणा बनून येत, दागिन्यांसह प्रेझेन्ट पाकिटांवर डल्ला मारला आहे. या चोरट्याला पोलिसांनी आता अटक केलीये. त्यानंतर त्याचे एकएक कारनामे समोर आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तो पाहुणा बनून सुटाबुटात यायचा अन् लग्न सोहळ्यात सहभागी व्हायचा. सुटबुटातला असलेला एक व्यक्ती हा वर पक्षाचा की वधु पक्षाचा हे कुणालाही समजायचं नाही. समारंभामध्ये सहभागी झाल्यानंतर नातेवाईकांकडून फेटा बांधून घेऊन, नारळ टोपीचा आहेर घेऊन शेवटी जाताना जेवणावर तो ताव ही मारायचा. जेवणावर ताव मारल्यानंतर त्याचा मोर्चा दागिन्यासह प्रेझेन्ट पाकिटावर जायता. लग्नात चोरी हा त्याचा हातखंड झाला होता. पण या चोरट्याचं सगळं बिंग फुटलं अन डोक्यावरचा फेटा थेट जेलमध्ये उतरवायला लागला.
गेल्या महिनाभरात कोल्हापूर शहर आणि परिसरातील विविध मंगल कार्यालयात चोऱ्या करुन एक चोरटा धुमाकूळ घालत होता. या चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापुरातल्या तीन आणि पुण्यातल्या एका पोलीस ठाण्यामध्ये या चोरट्या विरोधात गुन्हा दाखल आहे. बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील असं या चोरट्याचं नाव आहे. 21 गुन्हे नोंद असलेल्या या चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी शिताफीने पकडलं आहे. तब्बल पावणे चार लाखाचे दागिने या चोरट्याकडून जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चोरलेले दागिने हा चोरटा एका डब्यामध्ये भरून पुरून ठेवायचा. पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर त्याची ही भन्नाट आयडिया उघडकीस आली.
लग्न, जावळ, साखरपुडा अशा समारंभामध्ये हा पाहुणा बनून जायता. समारंभात आल्यानंतर तेथील नागरीकांशी संवाद साधायचा. लग्नातील इतर पाहुण्यांना बोलण्यात गुंतवायचा आणि पाहूणचार घ्यायचा. शेवटी जेवणावर ताव मारून जाताना हातसफाई करुन जायचा. त्यामुळे लग्नसमारंभ आणि इतर समारंभामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. कोल्हापुरातल्या घटनेनंतर नातेवाईकांनी आणि नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगणे गरजेचं आहे. समारंभातील मौल्यवान वस्तू, पाकिटे अनोळखी व्यक्तीच्या हाती देऊ नयेत. आपल्या विश्वासातील नातेवाईकांकडेच याची जबाबदारी सोपवण्यात यावी, असं आवाहन केलं जात आहे.