विशाल पुजारी
अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना कोल्हापुरात समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विविध प्रयोग केले जात आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पहिल्या तर पुरोगामी म्हणून ओळख निर्माण झालेल्या कोल्हापूरला भोंदू बाबा मांत्रीकांची लागण झाली का? असा प्रश्न निर्माण होतोय. विशेष म्हणजे हा व्हिडिओ अचानकपणे कशा काय समोर आला असाही प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलनसाठी काम करणाऱ्याकडून केला जात आहे..
चुटकी वाजून भूतबाधा काढण्याचा प्रयत्न होताना या व्हिडीओत दिसत आहे. शिवाय स्मशानभूमीत अघोरी पूजा, करणीचे प्रयोग होता आहे. या भोंदूबाबा मांत्रिकांच्या निवडणुकीपूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून कोल्हापूर जिल्ह्यात तंत्र मंत्रचे प्रकार वाढले आहेत. गेल्या काही काळात असे प्रकार समोर आले होते. सध्या कोल्हापुरात काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ आहेत चुटकी वाजून भूतबाधा, करणी करणाऱ्या मांत्रीकांचे. या व्हिडीओ समोर आल्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की काही लोक गळ्यात माळा घालून तंत्र मंत्र करत आहेत. महिलांवर मंत्रोच्चार करत अघोरी प्रकार सुरु आहेत. तर स्मशानभूमीत नारळ फोडून त्या ठिकाणी फोटोवर करणीसारखे प्रकार केले जात आहेत. समोर आलेल्या व्हिडीओ हा कोल्हापूर शहरातला असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळं पोलीस देखील खडबडून जागे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी शिरोली येथील स्मशानभूमित अघोरी प्रकाराची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर उदगाव, कुरुंदवाड, इंगळी, मुडशिंगी आणि इतरही काही गावामधील स्मशानभूमीत अघोरी पूजा झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते.
पण सध्याच्या प्रकरणातील भोंदूबाबाच्या या तंत्र मंत्रासह अनेक प्रकार देखील चर्चेत आहेत. महिलाना फसवून सगळे प्रकार करत असल्याची गुप्त चर्चा आहे. इतकंच नाहीतर एका महिलेला पळवून नेल्याची व्हायरल चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनीही हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळायाला हवं असं कोल्हापूरच्या नागरिकांचे म्हणणे आहे. कोल्हापुरातला हा प्रकार गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे निवडणुकीपूर्वी जाणून बुजून हे व्हिडीओ व्हायरल करून बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु आहे का असाही सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. काहीही असलं तरी चुटकी वाजून भूतबाधा, करणी करणं हा प्रकार फार गंभीर आहे. या भोंदू बाबा मांत्रिकांची कोल्हापूर जिल्ह्यात साखळी वाढतेय का याचा तपास पोलिसांनी घ्यायला हवा.