नवऱ्या विरोधात अनेक ठिकाणी त्याची पत्नी तक्रारी दाखल करत असते. अनेक प्रकरण तर गंभीर असतात. काही प्रकरणं कोर्टापर्यंत ही जातात. अशात एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यात पत्नीने आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. पण हे जोडपं खास आहे. त्याला कारण ही तसेच आहे. हे दोघेही पती पत्नी हे IAS अधिकारी आहेत. राजस्थान सरकारमध्ये हे दोघेही कार्यरत आहेत. जयपूरमध्ये एका महिला आयएएस अधिकाऱ्याने त्यांचे आयएएस पती आशीष मोदी यांच्या विरोधात एसएमएस हॉस्पिटल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार गंभीर स्वरूपाची आहे.
राजस्थान केडर मिळवण्यासाठी भावनिक दबाव टाकून जबरदस्तीने लग्न केल्याचा त्यांनी आरोप केला आहे. शिवाय त्यानंतर शारीरिक-मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एसएमएस हॉस्पिटलचे पोलीस ठाणे प्रभारी रामकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएएस भारती दीक्षित यांनी 7 नोव्हेंबर रोजी पती आशीष मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार, 2014 मध्ये त्यांचे वडील कर्करोगाने (Cancer) त्रस्त असताना मोदी यांनी त्यांच्या भावनिक दुर्बळतेचा फायदा घेतला. शिवाय लग्नासाठी भाग पाडले. तसेच, मोदी यांनी स्वतःबद्दल खोटी माहिती दिली आणि नंतर वारंवार शारीरिक तसेच मानसिक छळ केला असा आरोप केला आहे.
आरोप फिरयादीनुसार, मोदी वारंवार दारू पिऊन आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्क ठेवत असतात. तसेच प्रश्न विचारल्यास मारहाण करत असत. 2018 मध्ये मुलगी झाल्यानंतर छळ अधिक वाढला होता. दीक्षित यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सरकारी गाडीतून अपहरण करून अनेक तास बंधक बनवले होते. शिवाय घटस्फोट न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप केला आहे.
याशिवाय, मोदी यांनी त्यांच्या खोलीत गुप्त कॅमेरा लावला होता. सरकारी गोपनीय कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांचा मोबाईल फोन अन्य उपकरणांशी अवैधपणे जोडला होता. कार्यरत आयएएस अधिकारी असूनही मोदी खासगी आणि गुन्हेगारी कामांसाठी आपल्या पदाचा आणि सरकारी संसाधनांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही दीक्षित यांनी केला आहे. मोदी हे 2014 च्या बॅचचे अधिकारी असून सध्या ते बिहारमध्ये निवडणूक ड्युटीवर आहेत. त्यांनी या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world