Kolhapur News: कोल्हापुरात नेमकं काय घडलं? हॉटेल मालकाची 'ती' चूक अन् संतापलेल्या तरुणाने समोर दिसेल ते फोडलं

Kolhapur News:  कोल्हापूर शहरातील गजबजलेल्या लक्ष्मीपुरी परिसरात एका तरुणाने भरदिवसा हॉटेलची तोडफोड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kolhapur News: या प्रकरणामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Kolhapur News:  कोल्हापूर शहरातील गजबजलेल्या लक्ष्मीपुरी परिसरात आज दुपारी (मंगळवार 17 फेब्रुवारी) एका तरुणाने भरदिवसा हॉटेलची तोडफोड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संतापलेल्या या तरुणाने स्वस्तिक हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली असून, अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपुरी परिसरातील स्वस्तिक हॉटेलसमोर दुपारी 12 च्या सुमारास एक तरुण आला. तो प्रचंड रागात होता आणि हॉटेल मालकाच्या नावाने मोठ्याने ओरडू लागला. काही कळण्याच्या आतच त्याने हॉटेलवर हल्ला चढवला. सुरुवातीला त्याने हॉटेलचा मुख्य बॅनर फाडून टाकला आणि त्यानंतर समोर दिसेल त्या वस्तूंची नासधूस करण्यास सुरुवात केली. हॉटेलमधील टेबल, खुर्च्यांवर त्याने मोठे दगड घातले, ज्यामुळे हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.

( नक्की वाचा : Dombivli News धक्कादायक! डोंबिवलीतील 'त्या' अग्नीकांडाचा व्हिलन इमारतीतलाच तरुण; पार्किंगमध्ये नक्की काय घडलं? )
 

हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने हॉटेलमधील काउंटरवर असलेला कम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचीही तोडफोड केली. तो रागाच्या भरात इतका ओरडत होता की आजूबाजूचे दुकानदार आणि नागरिक प्रचंड घाबरून गेले. परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, पण तरुणाचा अवतार पाहून कोणाचीही त्याला रोखण्याची हिंमत होत नव्हती. या सर्व प्रकारामुळे लक्ष्मीपुरी सारख्या व्यापारी भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

का केला हॉटेलवर हल्ला?

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर या तोडफोडीमागचे धक्कादायक कारण समोर आले. ज्यावेळी पोलीस या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी तो ओरडून सांगत होता की हॉटेल मालकाने त्याच्या घरातील एका महिलेला अश्लील मेसेज पाठवला आहे. याच संतापामुळे त्याने कायदा हातात घेऊन हॉटेलची तोडफोड करण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक सन्मानाला धक्का लागल्याच्या भावनेतून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Dharashiv News : अखेरचा निरोप घेण्यापूर्वी लिहून ठेवलं सगळं; मुख्याध्यापकाच्या पत्राने खळबळ, नेमकं काय घडलं? )

लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. हॉटेल मालकावर त्याने केलेले आरोप किती खरे आहेत आणि नक्की कोणता मेसेज पाठवला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. याप्रकरणी हॉटेल मालकाचीही बाजू ऐकून घेतली जाणार असून, अश्लील मेसेज प्रकरणी तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सध्यातरी या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
 

Topics mentioned in this article