Dombivli Fire Case: डोंबिवलीतील सागाव परिसरात असलेल्या रविकिरण सोसायटीमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक वळण समोर आले आहे. ही आग अपघाती नसून ती मुद्दाम लावली गेल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास चक्रे फिरवून एका तरुणाला अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
कसा झाला गुन्ह्याचा उलगडा
दोन दिवसांपूर्वी पहाटे 4.15 वाजताच्या सुमारास सागाव येथील राज अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ही भीषण आग लागली होती. सुरुवातीला हा शॉर्ट सर्किटचा प्रकार असावा असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, मानपाडा पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक संशयास्पद हालचाल दिसून आली.
(नक्की वाचा : Ulhasnagar News :उल्हासनगरच्या भर चौकातून उचलले अन् माथेरानच्या लॉजवर नग्न करून अमानुष छळ! कारण काय? )
इमारतीत राहणारा लवेश पार्टे हा तरुण पहाटेच्या वेळी आपल्या घरातून काहीतरी वस्तू घेऊन खाली आला आणि त्याने ती वस्तू पार्किंगमधील कचरा पेटीत टाकली. ही वस्तू टाकल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच कचरा पेटीने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले.
पाच जण गंभीर जखमी आणि वाहनांचे नुकसान
या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 29 दुचाकी काही वेळातच जळून खाक झाल्या. आगीचा धूर आणि ज्वालांमुळे इमारतीत राहणारे नागरिक भयभीत झाले होते. या आगीत 5 जण गंभीर जखमी झाले असून, त्यात एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
विशेष म्हणजे या आगीच्या विळख्यात त्या महिलेची दोन लहान मुले देखील सापडली असून ती जखमी झाली आहेत. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत मोठे आर्थिक आणि मानवी नुकसान झाले होते.
( नक्की वाचा : Satara News: साताऱ्यातील शेतकऱ्याला 1 कोटी 80 लाखांचा गंडा,मुंबईच्या नगरसेविकेसह मंत्रालयातील 'बाबू' रडारवर! )
आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी सीसीटीव्ही पुराव्यांच्या आधारे लवेश पार्टे याला तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लवेशने नेमकी कोणती वस्तू कचरा पेटीत टाकली होती आणि त्याने हे कृत्य का केले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या कृत्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता, हे पोलीस चौकशीतून लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world