विशाल पुजारी
एका व्हिडीओमुळे वसतिगृहांमधलं भयाण वास्तव समोर आलं आहे. हा व्हिडीओ कोल्हापूरच्या तळसंदे गावातील निवासी शाळेतल्या वसतिगृहातला आहे. इथं वसतिगृहातील मोठी मुलं लहान मुलांना लाथा बुक्यांनी मारहाण करत आहेत. त्याचाच हा व्हिडीओ आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलांना अशी मारहाण नेहमीच होत असते. शामराव पाटील शिक्षण संस्थेमधील या धक्कादायक व्हिडीओनंतर आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे तर आणखी खळबळ उडाली आहे.
दुसरा व्हिडीओ जो समोर आला आहे त्यात तर वसतिगृहाच्या रेक्टरनेच एका मुलाला जबरी मारहाण केली आहे. मारहाणीनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. पण कारवाई झालीच नाही असा आरोप मारहाण झालेल्या मुलाने आणि त्याच्या वडीलाने केला आहे. जवळपास नऊशेहून अधिक मुलं शामराव विठ्ठल शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे रविकिरण इंगवले आणि शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या गिरीश फोंडे यांनी संस्थेला जाब विचारला आहे.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
दरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणात शाळेनेही आपली बाजू मांडली आहे. जुना व्हिडीओ व्हायरल करून शाळेची बदनामी केली जात असल्याचं शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे. रुपाली पाटील या सध्या शामराव पाटील शिक्षण समूहाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडीओ सहा ते सात महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जातं आहे. तर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आरोपींवर कठोर कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे.
शिस्तीच्या नावावर चालणारी बेदम मारहाण. वरच्या वर्गातील मुलांनी आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छळ करणं. आणि शिक्षकांनीही अशा प्रकारांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणं. अशा प्रकरणांमुळे पालकांचा शिक्षण संस्थांवरचा विश्वास डळमळीत होतोय. असे प्रकार होवू नयेत यासाठी शिक्षण संस्थांनी पावलं उचलण्याची गरज आहे. तसे झाले नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर हे प्रकार होतचं राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे.