एखाद्या प्रकरणात चुकीच्या आरोपीला अटक होणे, अथवा भलत्याच व्यक्तीच्या विरोधात तक्रार करणे हे प्रकार नवे नाहीत. या प्रकरणात पीडित व्यक्तीची मोठी बदनामी होत असते. असंच एक धक्कादायक प्रकरण कोलकातामध्ये उघड झालं आहे.
कोलकाता येथील न्यायालयाने बलात्काराच्या एका प्रकरणातील आरोपीला दोषमुक्त केले आहे. महिलेने न्यायालयात सांगितले की, गैरसमजातून तिने तक्रार दाखल केली होती आणि आता तिला त्या घटनेची संपूर्ण माहिती आठवत नाही. हे प्रकरण 24 नोव्हेंबर 2020 रोजी दाखल झाले होते, ज्यात आरोपीला दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली होती. त्याला 51 दिवस तुरुंगात राहावे लागले आणि 14 जानेवारी 2021 रोजी त्याला जामीन मिळाला होता.
महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले होते की, ती 2017 पासून आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आरोपीने लग्नाचे वचन देऊन 'साल्ट लेक' येथील एका हॉटेलमध्ये तिच्यासोबत रात्र घालवली, जिथे दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. महिलेचा आरोप होता की, दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने लग्नास नकार दिला आणि तो पळून गेला.
( नक्की वाचा : इन्स्टाग्रामच्या फिल्टरने केला घात! 52 वर्षांची महिला पडली 26 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात, अखेर भयंकर शेवट )
मात्र, सुनावणीदरम्यान महिलेने सांगितले की, तक्रार तिच्या मित्राने लिहिली होती आणि तिने ती न वाचता त्यावर सही केली होती. तिला आता काही आठवत नाही, असेही तिने सांगितले.
या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिंद्य बॅनर्जी यांनी सांगितले की, सरकारी पक्ष भारतीय दंड विधान कलम 376 (बलात्कार) आणि 417 (फसवणूक) अंतर्गत आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे आरोपी रोपी संशयाचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे.
'तक्रारदार महिलेच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की दोन्ही प्रौढ व्यक्तींमध्ये सहमतीने संबंध प्रस्थापित झाले होते. महिलेने तिच्या साक्षीमध्ये आरोपीविरुद्ध कोणताही ठोस आरोप केला नाही. सरकारी पक्षाचे इतर साक्षीदार—महिलेची आई, आजी आणि शेजारी—देखील आरोपांची पुष्टी करू शकले नाहीत,' असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.