Kopargaon Crime News : कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रूक शिवारात अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाच कोडं अखेर उलगडलंय. 8 ऑगस्ट रोजी मिळालेला मृतदेह वनिता ऊर्फ वर्षा मोहिते हिचा असून तिच्याच पतीने तिचा खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्धवट जाळल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे. न्यायालयीन दावे सुरू असताना वारंवार येणा-या वॉरंटमुळे पतीनेच पत्नीचा कट रचून काटा काढल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे.
कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाऊच बुद्रुक शिवारातील उंबरी नाल्याजवळ पाच दिवसांपूर्वी साधारण 45 वर्षीय वय असलेल्या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे समोर आले होतं. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्याला तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून सदर महिलेचा खून तिचा पती संजय हिरामण मोहिते याने आपल्या साथीदार मेव्हण्यासह मिळून कौटुंबिक वादातून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा - Kalyan News : कल्याणमध्ये चिमुकलीचं अपहरण अन् हत्या! खून पचला होता पण 8 महिन्यांनी मावशी-काका निघाले मारेकरी
कौटुंबिक वादातून हत्या...
वनिता ऊर्फ वर्षा मोहिते ही नागपूर जिल्ह्यातील गुमगाव हिंगाणा येथे तिच्या आईकडे वडिलांकडे राहत होती. आरोपी पती संजय हिरामण मोहिते याची दोन लग्न झाली असून मृत महिला ही आरोपीची पहिली पत्नी होती. त्यांच्यात कौटुंबिक वाद होता. हा वाद कोर्टात सुरू होता. हा वाद न्यायालयीन असल्याने त्याला वारंवार वॉरंट येत होतं. परिणामी त्याच्या दुसऱ्या लग्नावरही याचा परिणाम होत होता. त्यामुळे आरोपीने दुसऱ्या पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
मृत महिला कोपरगावला आली असता आरोपी पती संजय मोहिते याने त्याचा मेव्हणा गजानन मोहीते यांच्या मदतीने पत्नीला कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक शिवारातील उंबरी नाल्याजवळ नेत तिचा गळा दाबून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अर्थवट जाळून टाकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपी पती संजय मोहिते याला शहर पोलिसांनी सवळीविहिर येथून ताब्यात घेत गजाआड केले आहे. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणातील फरार साथीदाराचा शोध शहर पोलीस घेत आहे.