शुभम बायस्कार
प्रयागराज इथं महाकुंभमेळा होत आहे. यासाठी जगभरातून भाविक प्रयागराज इथं जात आहेत. मात्र काही भाविकांना माफक दरात कुंभमेळ्यात सोईसुविधा देण्याच्या नावाखाली चक्क फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही फसवणूक महाराष्ट्रातील अमरावतीच्या भाविकांची झाली आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक दुसरी तिसरी कुणी नाही तर एका राजकीय पक्षाच्या नेत्याने केल्याचा आरोप या भाविकांनी केला आहे. हा राजकीय पक्ष आणि त्याच्या नेत्याचे नाव ऐकून सर्वच जण आवाक झाले आहेत. शिवाय याबाबतचा जाब भाविकांनी थेट गृहराज्यमंत्र्यांनाच विचारला. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमातच राडा झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमरावतीतून 450 भावीक प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेले होते. त्यांनी एका ट्रॅव्हल्सने अमरावती ते प्रयागराज असा प्रवास केला होता. या प्रत्येक भाविकाकडून 6 हजार रुपये घेण्यात आले. या पैशात अमरावती ते प्रयागराज प्रवास, राहण्याची सोय, त्याच बरोबर नाष्टा जेवण ही देण्याचे आश्वास देण्यात आले होते. मात्र दिलेल्या आश्वासनाची पुर्तताच झाली नाही. त्यामुळे प्रयागराजमध्ये या भाविकांची मोठी गैरसोय झाली. भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रचंड गर्दी, त्यात मोठ्या प्रमाणात थंडी याचा फटका या अमरावतीच्या भाविकांना बसला. हे भाविक कसेबसे आज अमरावतीत दाखल झाले.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
या सर्व भाविकांना प्रयागराजला घेवून जाण्याचे आयोजन युवा स्वाभिमान पक्षाचा पदाधिकारी सुरज मिश्रा याने केले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचा आरोप सर्वच भाविकांनी केला आहे. अमरावतीत ते आल्यानंतर या सर्व भाविकांचा संताप अनावर झाला. त्यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यावर धडक दिली. शिवाय सुरज मिश्रा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी आंदोलकांची बाजू ऐकून न घेतल्यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पहिल्यांदा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्याचवेळी पोलिसांच्या कार्यक्रमासाठी अमरावतीत आलेल्या गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या कार्यक्रमात देखील आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलीस आणि भाविकांमध्ये मोठी झटापट झाली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर या भाविकांना पांगवत फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर, कैलास फुंडकर, पोलीस निरीक्षक निलेश करे आदी अधिकारी भाविकांची बाजू समजून घेतली. भाविकांकडून तक्रार प्राप्त झाल्यावर तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर संबंधितांवर कार्यवाही केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.