भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाल्याचं सांगितलं जातं. मात्र योजनेत अनेक अपात्र महिलांकडून लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर अनेक टप्प्यात याची छाननी सुरू आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली शेकडो बनावट बँक खाती उघडून पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठीही वापर केल्याचा प्रकार पोलिसांनी समोर आणला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून या टोळीचा म्होरक्या गुजरातचा असून तो फरार आहे. गुजरात येथून हा म्होरक्या रॅकेट चालवत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या टोळीतील एक आरोपी अविनाश कांबळे याला अटक केल्यानंतर या टोळीचा उलगडा झाला.
नक्की वाचा - 'Google' वर घेतला कॉल गर्लचा शोध; रिसर्च ट्रेनीचे 6 लाख उडाले, Cyber Crime चा धक्कादायक प्रकार
या टोळीचा म्होरक्या प्रतीक पटेल हा गुजरातमध्ये राहतो. येथून त्याने तब्बल 2500 हून अधिक बँक खाती उघडली होती. या प्रत्येक अकाऊंट मागे त्याला 4 हजार रुपये मिळायचे. तसेच महिलांकडून घेतलेल्या कागदपत्राच्या आधारे त्याने अनेक बँक खाते उघडून त्याने सायबर गुन्हे देखील केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.