त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी
Latur News : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका नराधम मुलाने केवळ दारूच्या पैशांसाठी आपल्या पोटच्या आईचा बळी घेतल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या या मुलाने आईने पैसे नाकारताच रागाच्या भरात तिच्यावर हल्ला केला आणि यातच त्या माऊलीचा दुर्दैवी अंत झाला. नात्यातील ओलावा संपवून क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना उदगीर तालुक्यातील करखेली गावात घडली आहे.
काय आहे प्रकरण?
करखेली गावातील सैलानी बक्सुद्दीन मुंजेवार याला दारूचे प्रचंड व्यसन जडले होते. घटनेच्या दिवशी त्याने आपली आई यासीन मुंजेवार यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, आईने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
हा नकार सैलानीच्या पचनी पडला नाही आणि तो संतापला. रागाच्या भरात त्याने आपल्या आईला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने आईचे केस धरून तिचे डोके जमिनीवर जोरात आपटले. या भीषण हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
( नक्की वाचा : लग्नाला झाले होते फक्त 2 महिने ! पत्नी प्रियकरासोबत पळाली,पती आणि मध्यस्थानं संपवलं आयुष्य )
वडिलांनीच मुलांविरुद्ध दिली तक्रार
या संतापजनक घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या मुलानेच पत्नीची हत्या केल्याने धक्का बसलेल्या वडिलांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. मृत महिलेचे पती बक्सुद्दीन मुंजेवार यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आपल्या मुला विरोधात तक्रार दाखल केली. आपल्या डोळ्यादेखत मुलाने पत्नीचा जीव घेतल्याचे त्यांनी तक्रारीत स्पष्ट केले असून, पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे.
( नक्की वाचा : Sadhvi Death Mystery: इंजेक्शन,Insta पोस्ट आणि Viral Video, साध्वीच्या धक्कादायक मृत्यूनं लाखो अनुयायींना शॉक! )
आरोपी मुलगा पोलीस कोठडीत
बक्सुद्दीन मुंजेवार यांच्या फिर्यादीवरून सैलानी बक्सुद्दीन मुंजेवार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी सैलानीला ताब्यात घेतले आहे. दारूच्या व्यसनापायी एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी होत आहे.