लोन किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी विविध बँकांकडून नियमितपणे फोन येत असतात. अनेकजण याला बळी पडतात. एकाच वेळी मोठी किंमत मिळत असल्याने त्या आमिषाला तरुण बळी पडतात. मात्र कर्ज भरण्याची वेळ येते तेव्हा मात्र अवघड जातं. अशातच तरुण नको ते पाऊल उचलतात. लातूर जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील सिंदखेड येथील तरुणाला क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बॅंकेच्या वतीने वसुलीसाठी लावलेला तगादा आणि मित्रांमध्ये होत असलेली बदनामीला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवलं.
नक्की वाचा - Pune Crime : पुण्याच्या IT कंपनीत तरुणीची हत्या, सहकाऱ्याने पार्किंगमध्ये गाठलं अन्...
निलंगा तालुक्यातील सिंदखेड येथील तरुण सुशील दिलीप बोलसुरे हा पुणे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. सुशील याने एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 1 लाख 27 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरण्यास तगादा लावला होता. तरुणाने याची धास्ती घेतली होती. मित्रांमध्ये आपली बदनामी होत असल्याने त्यांनी शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.