Son Kills Father: एका प्रतिष्ठीत कुटुंबातील शांत वाटणाऱ्या घराच्या भिंतींआड इतके मोठे क्रौर्य लपले असेल, याची कुणीही कल्पना केली नसेल. एका बापाने आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे, समाजात नाव कमवावे यासाठी जिवाचे रान केले होते. मात्र, त्याच मुलाच्या मनात वडिलांविषयी आदराऐवजी सूडाची भावना घर करून बसली होती.
करियरचा दबाव आणि शिक्षणाचा तगादा यातून निर्माण झालेला हा संघर्ष इतक्या टोकाला जाईल, की पोटचा मुलगाच बापाच्या रक्ताचा तहानलेला होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. घरातील एका कोपऱ्यात ठेवलेला तो साधा निळा ड्रम जेव्हा पोलिसांनी उघडला, तेव्हा समोर आलेले दृश्य पाहून तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
काय आहे प्रकरण?
ही सुन्न करणारी घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील आशियाना भागात घडली आहे. व्यवसायाने मोठे मद्य आणि औषध व्यावसायिक असलेले मानवेन्द्र सिंह हे 20 फेब्रुवारीपासून अचानक बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेत असताना पोलिसांना त्यांच्याच घरातील एका निळ्या ड्रममध्ये त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला.
धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या बाहेरच्या कोणीही नाही, तर त्यांच्या स्वतःच्या 21 वर्षांच्या मुलाने, अक्षत प्रताप सिंह याने केली होती. त्याने वडिलांच्याच लायसन्सी रायफलने गोळ्या झाडून त्यांचा जीव घेतला.
( नक्की वाचा : Pune News : वेटर ते आंतरराष्ट्रीय तस्कर, बुधवार पेठेतील महिलांच्या नशिबाशी खेळणाऱ्या बाबू भैय्याचं गुपित उघड )
मुलाने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा
हत्या केल्यानंतर अक्षतने अतिशय थंड डोक्याने पुरावे नष्ट करण्याची तयारी केली होती. त्याने वडिलांच्या मृतदेहाचे गुढघ्यापासून खालचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात कापून शरीरापासून वेगळे केले. शरीराचा उरलेला भाग एका स्लीपिंग बॅगमध्ये भरून तो घरातल्या निळ्या ड्रममध्ये लपवून ठेवला होता.
पोलिसांसमोर सध्या मानवेन्द्र सिंह यांचे शिर शोधणे हे सर्वात मोठे आव्हान आहेय. कारण, अक्षतने वडिलांचे शिर कापून कुठेतरी गायब केले आहे. घरामध्ये 10 लिटर केरोसीनही सापडले आहे, ज्याचा वापर करून तो मृतदेहाचे तुकडे जाळून टाकण्याच्या तयारीत होता.
( नक्की वाचा : Shirdi News: 'बीफ खाल्ल्यावर गोरं होतं आणि नमाज...' शिर्डीत 15 वर्षांच्या मुलीचा लग्नासाठी छळ, वाचा सविस्तर )
हत्येचे कारण काय?
अक्षतचे वडील मानवेन्द्र सिंह यांची स्वतःची मोठी पॅथॉलॉजी लॅब आणि मद्य विक्रीचा व्यवसाय होता. त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याने डॉक्टर व्हावे आणि आपला व्यवसाय सांभाळावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, अक्षतचा ओढा अभ्यासाकडे अजिबात नव्हता. अभ्यासासाठी आणि मेडिकलच्या शिक्षणासाठी वडील सतत दबाव टाकत असल्याने अक्षतच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला होता. तो लहानपणापासूनच अत्यंत हट्टी आणि रागीट स्वभावाचा होता. यापूर्वीही तो एकदा घरातून चिठ्ठी लिहून पळून गेला होता.
बहिणीसमोरच घडले थरारनाट्य
या सर्व हत्याकांडात आणखी एक धक्कादायक वळण म्हणजे, अक्षतने ही सर्व कृत्ये त्याच्या सख्ख्या बहिणीसमोर केली. वडिलांची हत्या करताना आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करताना बहीण सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत होती.
बापाचा असा अंत पाहून ती प्रचंड दहशतीत होती. अक्षतने तिला धमकी दिली होती की,याबद्दल कोणाला काही सांगितले तर तुझेही हाल असेच होतील. या भीतीमुळेच तिने अनेक दिवस आपले तोंड बंद ठेवले होते. सध्या अक्षत पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world