वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सरला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्यावर पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सामाजिक भावना दुखावल्या प्रकरणी रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून याबाबत शोएब इस्माईल शेख (वय 62, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगिरी महाराज यांनी जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यामुळे इतर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी रामगिरी महाराज यांच्यावर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नक्की वाचा - 'लाडक्या बहिणी'नंतर राज्य सरकार आता 'लाडका शेतकरी' योजना राबवणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
कोण आहेत रामगिरी महाराज?
रामगिरी महाराजांचं मूळ नाव सुरेश रामकृष्ण राणे असं आहे. जळगावात त्यांचा जन्म झाला असून त्यांचं शालेय शिक्षणही तिथेच झाले. 1988 पासून रामगिरी महाराज स्वाध्याय गीतेचं अध्यायाचं पाठांतर करून ध्यानधारणा करू लागले. पुढे शिक्षण सुरू न ठेवता त्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात प्रवेश केला. 2009 मध्ये त्यांनी दीक्षा घेतली आणि गंगाहीर महाराज यांचं शिष्य नारायणगिरी महाराज यांना आपले गुरू मानून त्यांच्या सान्निध्याय राहू लागले. पुढे त्यांच्या निधनानंतर रामगिरी महाराज सराला बेटच्या गादीचे वारसदार झाले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे सप्हाता दरवर्षी लाखो भाविक येत असतात. 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या 177 व्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती.