पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब सोमवारी, 27 मे रोजी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उघड केली. दरम्यान पुराव्यांची अदलाबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे एचओडी अजय तावरे आणि सीएमओ श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, दुसरीकडे या दोन्ही डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने कारवाई सुरू केली आहे.
पुण्यातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळणोर या दोघांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोटीस बजावत सात दिवसांच्या आत लेखी उत्तर मागितले आहे. दोन्ही डॉक्टरांची कृत्य डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं आणि वैद्यकीय व्यवसायाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचं मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे विद्यमान प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी व्यक्त केली आहे. ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्या संदर्भात केलेलं कृत्यावर कौन्सिलकडे संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील डॉक्टरचे स्पष्टीकरण तसेच पुरावे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तपासणार असून त्यानंतर पुढे दोन्ही डॉक्टरांविरोधात कारवाई केली जाईल असेही डॉक्टर रुघवानी म्हणाले. प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे स्वतःहून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या प्रकरणात कारवाई सुरू केली असल्याचे डॉ. रुघवानी यांनी सांगितले.
नक्की वाचा - रक्ताचा नमुना कचऱ्यात, ससूनच्या डॉक्टरांचं बिंग असं फुटलं; आयुक्तांकडून धक्कादायक माहिती
'मी शांत बसणार नाही, सर्वांची नावं उघड करेल' असा इशारा डॉ. तावरे यांनी दिलाय. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणि ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या नमुन्यात अदलाबदल करण्यात आली याचे संकेत तावरे यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या माहितीच्या अधारे डॉ. तावरे, डॉ. हरलोर आणि या प्रकरणातील मध्यस्थ अतुल घटकांबळे या तिघांना अटक केलीय. या सर्वांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.