Buldhana News : बाप-भावावर हत्येचा डाग, पण मुलगी जिवंत परतली! पोलिसांच्या अजब तपासाची धक्कादायक कहाणी

Maharashtra Police Under Fire : या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस तपासाच्या पद्धतीवर आणि घाईघाईने केलेल्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Maharashtra Police Under Fire : मृत मानलेली मुलगी जिवंत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ज्या मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी जन्मदात्या पित्याला आणि भावाला तुरुंगात डांबले होते, तीच मुलगी आता सुखरूप समोर आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस तपासाच्या पद्धतीवर आणि घाईघाईने केलेल्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात घडली आहे. बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खडकी गावातील शिवानी नावाची मुलगी एप्रिल महिन्यात अचानक बेपत्ता झाली होती. ती एका तरुणासोबत निघून गेल्याची चर्चा होती. तिच्या कुटुंबीयांनी 1 मे रोजी ती बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रारही पोलिसात नोंदवली होती. मात्र, काही दिवसांतच अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे निष्पाप पित्याला आणि भावाला तुरुंगाची हवा खावी लागली.

Advertisement

( नक्की वाचा : NEET Paper Leak : नीट पेपरफुटीत पुण्याचा 'गॉड' अटकेत! मनिषा हवालदारसोबत नेमकं कनेक्शन काय? वाचा सविस्तर )

अज्ञाताचा मृतदेह आणि पोलिसांची घाई

मुलीचा शोध सुरू असतानाच साधारण 10 दिवसांनी महाराष्ट्रातील जळगाव जामोद परिसरात एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला. या मृतदेहाचे शिर धडावेगळे करण्यात आले होते आणि तो जाळण्याचाही प्रयत्न झाला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने ओळख पटवणे कठीण होते. 

दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता खकनार येथून एक मुलगी बेपत्ता असल्याची माहिती त्यांना मिळाली. ठोस पुरावा किंवा डीएनए चाचणी न करता पोलिसांनी तो मृतदेह शिवानीचाच असल्याचे गृहीत धरले आणि तपासाची चक्रे फिरवली.

( नक्की वाचा : Marriage Scam: वऱ्हाड आलं, नवरदेव नटले पण नवरीच बेपत्ता! एकाच वेळी 42 घरांमध्ये सनईऐवजी पसरली शांतता )

निर्दोष वडील आणि भावाला जेल

महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणात कमालीची घाई दाखवत हत्येचा गुन्हा दाखल केला. कोणतीही शहानिशा न करता पोलिसांनी शिवानीचे वडील बापूराम कलमेगर आणि भाऊ अजय यांना आरोपी ठरवून अटक केली. या दोघांनाही बुलढाणा येथील जेलमध्ये पाठवण्यात आले. एका बाजूला मुलीच्या जाण्याचे दुःख आणि दुसरीकडे हत्येचा खोटा आरोप, यामुळे हे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. मात्र, आता शिवानी स्वतः जिवंत समोर आल्याने पोलिसांच्या या कारवाईतील मोठी चूक उघड झाली आहे.

जिवंत शिवानीने मागितला न्याय

संपूर्ण प्रकरणात मोठा वळण तेव्हा आले जेव्हा शिवानी अरुण नावाच्या तरुणासोबत स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाली. आपण जिवंत असून आपल्या वडिलांना आणि भावाला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचे तिने स्पष्टपणे सांगितले. माझे वडील आणि भाऊ पूर्णपणे निर्दोष आहेत, त्यांना तातडीने मुक्त करावे, अशी विनंती तिने प्रशासनाकडे केली आहे. खकनार पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक जाधव यांनीही मुलगी जिवंत मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Advertisement

या प्रकरणाने महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ अंदाजाच्या जोरावर कोणालाही आरोपी ठरवणे आणि तुरुंगात टाकणे ही मोठी निष्काळजी मानली जात आहे. आता पोलिसांसमोर दोन मुख्य आव्हाने आहेत. पहिले म्हणजे तुरुंगात असलेल्या निर्दोष बाप-लेकाची सन्मानपूर्वक सुटका करणे आणि दुसरे म्हणजे, जळगाव जामोदमध्ये सापडलेला तो अज्ञात मृतदेह नेमका कोणाचा होता? त्या मृत तरुणीची ओळख पटवून खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे आता पोलिसांसाठी मोठी परीक्षा असणार आहे.
 

Topics mentioned in this article