Instagram Love Story : सोशल मीडियामुळे जग जवळ आले. वेगवेगळ्या भागातील दोन व्यक्ती या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आल्या. त्यामधील काही जणांमध्ये प्रेम निर्माण झालं. काहींचं प्रेम यशस्वी ठरलं. पण, काहींना यामध्ये जीव देखील गमावाला लागला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यात 52 वर्षांच्या महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 26 वर्षांच्या तरुण अरुण राजपूतला अटक केली आहे. 11 ऑगस्ट रोजी मैनपुरी कोतवाली भागातील खरपरी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडल्यावर हे प्रकरण समोर आले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून खून झाल्याचे समोर आले.
फोटो फिल्टरचा खेळ आणि झाले प्रेम
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर दोघांची ओळख झाली. महिलेने फोटो फिल्टर वापरल्यामुळे तरुणाला तिच्या खऱ्या वयाचा अंदाज आला नाही. हळूहळू, ऑनलाइन संभाषण मैत्रीत आणि नंतर कथित प्रेमसंबंधात बदलले. महिलेने तरुणाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. याच दरम्यान, महिलेने तरुणाला दीड लाख रुपयेही दिले होते, जे ती परत मागत होती.
( नक्की वाचा : इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली जीवघेणी; टिटवाळ्याच्या तरुणीनं व्हिडिओ कॉल करत संपवलं आयुष्य )
शहर पोलीस अधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, ही एक ब्लाइंड मर्डर केस होता. आरोपी अरुण राजपूतला अटक केल्यावर या प्रकरणाचा खुलासा झाला. चौकशीत समोर आले की, दीड वर्षांपूर्वी महिला आणि तरुण इंस्टाग्रामच्या माध्यमातून भेटले होते. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी मोबाईल नंबर शेअर केले आणि त्यानंतर अनेकदा भेटले.
हत्येच्या दिवशी, महिला फर्रुखाबादहून तरुणाला भेटण्यासाठी मैनपुरीला आली होती. बोलताना महिलेने तरुणावर लग्नासाठी दबाव टाकला आणि आधी दिलेले दीड लाख रुपये परत मागू लागली. याच वेळी वाद वाढला आणि आरोपीने महिलेच्या ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.
पोलिसांनी आरोपीकडून महिलेचा मोबाईल, सिम कार्ड आणि इतर डिजिटल पुरावे जप्त केले आहेत, ज्यात दोघांमधील संभाषण आणि फोटो आहेत. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.