Shocking News : एका व्यक्तीची विचारसरणी किती टोकाची असू शकते आणि त्यातून तो स्वत:च्याच रक्ताच्या नात्यांशी किती क्रूरपणे वागू शकतो, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ धार्मिक कट्टरता आणि संशयी वृत्तीमुळे एका नराधमाने त्याच्या पत्नीसह दोन चिमुरड्या मुलींचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, ज्या पत्नीसोबत त्याने 18 वर्षे संसार केला, तिचा चेहरा जगाला दिसू नये म्हणून त्याने तिचे साधे आधार कार्ड देखील बनवले नव्हते.
घरातील कलह आणि कट्टरता
फारुख असं या नराधमाचं नाव आहे. तो लग्नामध्ये आचारी म्हणून काम करतो. उत्तर प्रदेशातील शामलीमधील हा सर्व प्रकार आहे. फारुख अत्यंत अत्यंत कट्टर धार्मिक विचारांचा होता. गेल्या 18 वर्षांपासून त्याने आपल्या पत्नीला पडद्यात आणि बुरख्यात ठेवले होते. पत्नीचा फोटो काढावा लागेल या भीतीने त्याने तिचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड कधीच बनू दिले नाही.
इतकेच नाही तर जेव्हा त्याची पत्नी माहेरी जात असे, तेव्हा तिचा चेहरा कोणाला दिसू नये म्हणून तो स्वतः कॅब बुक करून द्यायचा. जेव्हा तिचे वडील घरी यायचे, तेव्हाही तो तिला आपल्या वडिलांना भेटू देत नसे.
( नक्की वाचा : Shirdi News : Instagram वर मैत्री आणि भेटीसाठी शिर्डी गाठली; भरचौकात दबा धरून बसलेल्यांनी केला घात )
काय ठरलं हत्येचं कारण?
या हत्याकांडामागचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. सुमारे एक महिन्यापूर्वी त्याची पत्नी ताहिरा ही न सांगता आणि बुरखा न घालता माहेरी गेली होती. ही गोष्ट फारुखला इतकी लागली की त्याला त्याची अब्रू गेल्यासारखे वाटले. यावरून त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. पत्नीला तिच्या मनाप्रमाणे घर चालवायचे होते, जे फारुखला मान्य नव्हते. याच रागातून त्याने 10 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता स्वयंपाकघरात ताहिराची गोळी झाडून हत्या केली.
दोन मुलींचाही घेतला बळी
गोळीबाराचा आवाज ऐकून त्याची मोठी मुलगी आफरीन तिथे धावत आली. बापाचे कृत्य पाहून ती घाबरली, पण फारुखने तिलाही सोडले नाही आणि तिच्यावरही गोळी झाडली. त्यानंतर त्याची दुसरी मुलगी सहरीन तिथे आली, तेव्हा फारुखने तिचा गळा दाबून तिला संपवून टाकले.
या तिन्ही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने घराच्या अंगणात शौचालयासाठी खोदलेल्या 9 फूट खोल खड्ड्यात त्यांना गाडून टाकले आणि वरून विटांचे बांधकाम करून मजला तयार केला होता.
असा उघड झाला गुन्हा
गेल्या 6 दिवसांपासून ताहिरा आणि तिच्या दोन मुली बेपत्ता होत्या. फारुखचे वडील दाऊद यांनी मुलाला अनेकदा विचारणा केली, पण तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याने सांगितले की त्यांना शामली येथे भाड्याच्या घरात ठेवले आहे. वडिलांना संशय आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी फारुखला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने या तिहेरी हत्याकांडाची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपी फारुखच्या सांगण्यावरून हत्येसाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे. त्याच्याकडून 315 बोअरची 3 पिस्तुले, 7 रिकाम्या काडतुसांची पुंगळी आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कट्टरपंथ कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे एक भयावह उदाहरण ठरले आहे.