शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli News : सांगलीतील आपटा पोलीस चौकीजवळच असलेल्या एका घोड्याच्या तबेल्यात शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाचा त्याच्याच दोघा मित्रांनी निघृण खून करण्यात आला आहे. अमीर रावसाहेब कन्नुरे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. जमील कुरणे यांच्या घोड्याच्या तबेल्यात मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. खुनानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने सूत्रं हलवून हल्लेखोर मलिक ऊर्फ मलक्या दस्तगीर मुलाणी, निशांत भिमसेन दासुद या दोघांना अटक केली आहे.
अमीर कन्नुरे हा गेल्या पाच-सहा वर्षापासून कुरणे यांच्या तबेल्यात झोपायला असायचा. तेथील किरकोळ कामे करत होता. अमीर याला दारूचं व्यसन होतं. संशयित मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते. तिघांना दारूचे व्यसन असल्यामुळे तिघेजण बऱ्याचदा एकत्र दारू प्यायला बसायचे. अमीर आणि संशयित मलिक, निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते. तेव्हा अमीर याने मित्रांना अश्लिल शिवीगाळ केली होती. त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता. याच रागाच्या भरातून दोघांनी अमीरचा काटा काढायचे ठरवले.रात्री अकराच्या सुमारास अमीर तबेल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला. तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा त्याच्या मित्रांसोबत तबेल्याच्या बाहेर गप्पा मारत बसला होता. काहीवेळाने मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आतमध्ये आला. काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफीससमोरील बोळात तो गेला.
नक्की वाचा - Chandrapur News : वाळू तस्करी ट्रकवर कारवाई केली नाही; पोलीस अधिकाऱ्याला मोठी शिक्षा
दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघेजण अमीरचा काटा काढायचा म्हणून तबेल्यापासून काही अंतरावर थांबलेले होते. नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचे पाहून दोघेजण आतमध्ये आले. अमीर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता. त्यांनी आत आल्यानंतर अमीरच्या तोंडावर एडक्यासारख्या हत्याराने वार केले. तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबेल्यात परतत होता. त्याला दोघेजण पळून जाताना दिसले. त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुचाकी सोडून तो पळाला. नितीन पळत तबेल्यात आला. तेव्हा अमीरवर हल्ला झाल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ कुरणे यांना कळवले. जखमी अमीर याला तत्काळ सिव्हील रुग्णालयात हलवले. परंतू स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरवत असतानाच त्याने जीव सोडला.