नाशिकच्या मनमाड युनियन बँक शाखेतील 'एफ.डी.' घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित संदीप देशमुख यास मनमाड पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती वाढल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत सुमारे 63 मुदत ठेवीदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार मनमाड पोलिसात करण्यात आली आहे. या घोटाळ्याची रक्कम आता साडेपाच कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान घोटाळ्यातील मुख्य संशयित संदीप देशमुख यास न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी आता त्याच्या नावे असलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. बँकेत विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या संदीप देशमुख याने मुदत ठेवी काढण्यासाठी तसेच मुदत ठेवी नुतनीकरण करण्यासाठी ठेवीदारांकडून बेरर चेक घेत स्वतःच्या नावावर वठवून त्यावर मुदतठेवीचा बनावट शिक्का मारून, बनावट पावत्या दिल्या आहेत. यामुळे शेकडो ठेवीदारांना कोटी रुपयांना गंडा घालून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे.
नक्की वाचा - कर्ज काढले, दागिने गहाण ठेवून केली गुंतवणूक; रत्नागिरीकरांची कोट्यवधींची फसवणूक
संतप्त ठेवीदारांची बँकेसमोर गर्दी होत आहे. दरम्यान आमदार सुहास कांदे यांनी फसवणूक झालेल्या ठेवीदारांची भेट त्यांच्या संपर्क कार्यालयावर बैठक घेतली. फसवणूक झालेल्या ठेवीदरांचा पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत ठेवीदारांना दिलासा दिला. बँकेच्या रिजनल मॅनेजरसह डेप्युटी मॅनेजर व बँकेतील सर्व दोषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. तपासाला गती मिळावी म्हणून याप्रकरणाची व्याप्ती मोठी असून मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अधिकारात एसआयटी स्थापन करून स्वतंत्रपणे चौकशी सुरू केल्याची माहितीही शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी दिली.