Madvi Hidma Killed : रात्री उशीरापर्यंत वाचन, गोमांस-चिकन प्रिय; कुख्यात नक्षलवादी कमांडरचा न पाहिलेला चेहरा

madvi hidma encounter : नक्षलवाद-माओवादाविरोधात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालंय. देशातील सर्वात धोकादायक नक्षलवादी कमांडरपैकी एक माडवी हिडमा हा मंगळवारी चकमकीत मारला गेला.

जाहिरात
Read Time: 5 mins

madvi hidma encounter : नक्षलवाद-माओवादाविरोधात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालंय. देशातील सर्वात धोकादायक नक्षलवादी कमांडरपैकी एक माडवी हिडमा हा मंगळवारी सकाळी चकमकीत मारला गेला. छत्तीसगड-आंध्रप्रदेशच्या सीमेवर ही चकमक झाली. खरं म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी हिडमाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षा दलांना ३० नोव्हेंबरपर्यंतची डेडलाईन दिली होती. त्यानंतर त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा कसून शोध घेतला जात होता. अखेर या डेडलाईनच्या १२ दिवस आधीच हिडमा चकमकीत मारला गेला आणि नक्षल्यांना एक मोठा दणका बसलाय. कशी झाली ही कारवाई? हिडमासह आणखी किती नक्षलवादी मारले गेले? हिडमा संपला म्हणजे नक्षलवाद्यांना नेमका कसा धक्का बसलाय, पाहूया यावर सविस्तर रिपोर्ट.

नक्षली हिडमाचा खात्मा

माडवी हिडमा म्हणजे देशातील सर्वात धोकादायक नक्षलवादी कमांडरपैकी एक...गेल्या दोन दशकांत २६ हून अधिक मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा सूत्रधार आणि सुरक्षा दलांच्या लिस्टमध्ये मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी. याच हिडमाचा खात्मा झाला आहे. मंगळवारी सकाळी छत्तीसगड-आंध्रप्रदेशच्या सीमेवर सुरक्षा रक्षकांची त्याच्याशी चकमक झाली. ही कारवाई कशी झाली याची सविस्तर माहिती या कारवाईचं नेतृत्व करणारे आंध्रप्रदेशच्या इंटेलिजन्सचे एडीजी महेश चंद्रा लढा यांनी दिली आहे.

या कारवाईनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशी बातचित केली आणि या कारवाईबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. गृहमंत्री अमित शहा यांनी हिडमाला संपवण्यासाठी सुरक्षा दलांना ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्याप्रमाणे आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणाच्या सीमेवर पुल्लागंडीच्या घनदाट जंगलात शोध मोहिम सुरू करण्यात आली. मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशच्या मारेदुमिली परिसरात अखेर त्याची गाठ सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान पडली. त्याची आणि सुरक्षा दलांची चकमक झाली. माडवी हिडमावर एक कोटींचं बक्षीस होतं. त्याच्यासह त्याची पत्नी राजे उर्फ राजक्का आणि त्याच्या इतर चार बॉडीगार्डना ठार करण्यात आलं. एकूण सहा नक्षलवादी या कारवाईत ठार करण्यात यश आलं.

दरम्यान, हिडमाला शरण येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याचं मन वळवण्यासाठी त्याच्या आईनंही प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी त्याच्या आईचा तसंच बरसी देवाच्या आईचा आवाहन करतानाचा व्हिडिओ देखील दाखवला होता

Advertisement

आता शरण ये, घरी ये, इथं आलास तर भलं होईल - हिडमाची आई

'कुठे आहेस तू ये असं सांगतेयं मी, तू आला नाहीस तर मी काय करायचं. इथे जवळपास असतास तर जंगलात मीच आले असते तुला शोधायला. मी आणखी काय सांगणार तुला. तू फक्त परत ये. नाही आलास तर मी कसं करायचं. घरी ये आता. जवळ असतास तर मीच तुला शोधायला, आले असते आणि परत आणलं असतं. तू आलास तर काहीतरी कमवून खाऊ-पिऊ, इथंच राहू आणि जगू. सगळ्यांबरोबर राहू' इथं घरीच राहून कमवून खाऊ आणि जगू असं तुला सांगितलं होतं ना. जाऊ नकोस सांगितलं तरी गेलास, घरातच राहिला तर इथंच शेत कसून राहू. नांगरा हाकायला कोणी नाही, सांगितलं तरी गेलास आता आम्ही काय करायचं. आता शरण ये, घरी ये, इथं आलास तर भलं होईल. काही दिवसांपूर्वीच तुला सांगितलं परत ये. जवळ असतास तर मीच घेऊन आले असते. आता तुला कुठे शोधू

मात्र हे नक्षलवादी आपल्या कुटुंबांचंही न ऐकता दाट जंगलांतच राहून कट कारवाया करत राहिले. त्यांचा अखेर जो व्हायचा होता तो झाला. हिडमा आणि इतर नक्षलवादी मारले गेल्यानंतर सुकमामध्ये जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके फोडून त्यानं आखलेल्या कटांचा अंत झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. माओवागी कमांडर हिडमा माडवी हा अत्यंत धोकादायक आणि क्रूर मानला जायचा. तो कोण होता त्यानं काय कारवाया केल्या यावर एक नजर टाकूया.

नक्की वाचा - लेक क्रिकेट जगताचा 'बादशहा'; मात्र सख्ख्या बापाची अन्नासाठी वणवण..., मृत्यूची मागतायेत भीक

हिडमा हे गेले 2 दशकं नक्षलवादी चळवळींमध्ये सक्रीय होता. अनेक मोठ्या कारवायांचा सूत्रधार होता. यात 2010 मध्ये दंतेवाडा हल्ल्याचा समावेश आहे. या हल्ल्यात 76 CRPF जवान शहीद झाले होते. 2013 मध्ये झिरम व्हॅली हल्ला, 2021 मध्ये सुकमा-बिजापूर हल्ला, ताड़मेटला कांड, झीरम कांड, बुरकापाल, टेकलगुडेम हल्ल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका

Advertisement

हिडमाचा मृत्यू म्हणजे नक्षलवादी चळवळीसाठी मोठा धक्का मानला जातो. त्याचा खात्मा म्हणजे या हिंसक संघटनेचा कणा मोडल्यासारखंच आहे. एनडीटीव्हीच्या टीमनं त्याच्या काही जुन्या आणि यापूर्वीच आत्मसमर्पण केलेल्या काही साथीदारांशी संवाद साधला तेव्हा हिडमा म्हणजे काय होता, तो कसा रहायाचा, नक्षल संघटनेत त्याची प्रतिमा काय होती याचा अंदाज आला.

हिडमाची माजी सुरक्षारक्षक सुंदरी ही पूर्वी नक्षलवादी होती. तिनं २०१४मध्ये आत्मसमर्पण केलं. आता दंतेवाडामध्ये DRGमध्ये कमांडो म्हणून तैनात आहे. ती १५ वर्ष नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय होती. हिडमाची ती बंदुकधारी सुरक्षारक्षक होती. हिडमा बस्तरच्या जंगलातच राहायचा. त्याच्या अवतीभवती सुरक्षारक्षकांचा मोठा गराडा असायचा. एखाद्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यापेक्षाही अधिक सुरक्षा त्याला होती. हिडमा अतिशय शिस्तबद्ध होता.

Advertisement

हिडमा रात्री उशीरापर्यंत पुस्तकं वाचायचा...

तो पहाटे चार वाजता उठायचा. व्यायाम आणि इतर दिनक्रम आटोपून पूर्ण बटालियनची कसरत करून घ्यायचा. सर्व बातमी गोळा करून आपल्या साथीदारांसह कट आखायचा. रात्री उशिरापर्यंत पुस्तकं वाचायचा. हिडमाला कोणतंही व्यसन नव्हतं. मात्र त्याला गोमांस, गावठी कोंबडी आणि दुधाचा चहा प्रचंड आवडायचा. त्याला डायबिटीस होता. तो अत्यंत क्रूर नेता होता अशी माहिती माजी नक्षल कमांडर बदरन्नानं दिली. हिडमाच्या गावात, पुवतीमध्ये ते श्रमदानातून तलाव निर्मिती करत होते. त्यावेळी त्यांची भेट हिडमासह झाली. नक्षलवादी तलावाची निर्मिती करतात हे पाहून तो नक्षलवादानं प्रभावित झाला. त्यानं बदरन्नाकडे नक्षलवादी चळवळीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली

बदरन्नानं त्याला नक्षलवादी चळवळीत सामील करून घेतलं. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला एका प्लाटूनचं नेतृत्व दिलं

अलिकडे नक्षलवादाविरोधात सुरू झालेल्या सुरक्षादलांच्या तीव्र मोहिमेनंतर अनेक नक्षलवादी मारले जात होते. त्यानंतर हिडमा देखील कमकुवत होत गेला, त्याला अनेकदा आत्मसमर्पणाचं आवाहनही करण्यात आलं होतं. त्याच्याच गावी, पुवतीमध्ये सुरक्षादलांनी कँप लावून तो कमकुवत झाल्याचा संदेशही त्याच्यापर्यंत पोहोचवला. मात्र त्यानं या आवाहनांना प्रतिसाद दिला नाही आणि अखेर मंगळवारी सकाळी तो चकमकीत मारला गेला. दरम्यान छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील एराबोर पोलीस स्टेशन परिसरात दुसऱ्या चकमकीत आणखी सहा नक्षलवादी ठार झाले. दोन्ही ठिकाणी सुरक्षादलांनी शोध मोहिम राबवलीय. या दोन्ही कारवायांदरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सापडलाय. गेल्या काही महिन्यांत आत्मसमर्पण आणि या मोहिमांच्या आधारे हिंसक नक्षलवादाचा बीमोड करण्यात सुरक्षा दलांना यश मिळतंय. त्यामुळे नक्षलवादाचा हा देशाला बसलेला विळखा आता दूर होतोय, असं म्हणायला हरकत नाही

Topics mentioned in this article