सुमित पवार, प्रतिनिधी
chhatrapati sambhajinagar road accident : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव माने (वय 71) आणि त्यांच्या पत्नी ॲड. रत्नमाला साळुंके-माने (वय 64) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी गेलेल्या या दाम्पत्याला घराकडे परतताना भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही दूरवर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरच्या नंदनवन कॉलनीचे रहिवासी असलेले डॉ. माने यांचे पडेगावच्या देशमुखनगरमध्येही निवासस्थान होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका नातेवाईकाचं निधन झालं होतं. काल (25 ऑक्टोबर) सायंकाळी माने दाम्पत्य त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना भेटून दोघेही पडेगावच्या रस्त्यावर आले. देशमुखनगरकडे जाण्यासाठी दोघेही एकमेकांचा हात पकडून रस्ता ओलांडत असताना नगरनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या भरधाव कारचालकाने त्यांना उडवले. दोघेही दूरवर फेकले जाऊन डोके, छातीला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉ. रामराव माने आणि विधिज्ञ ॲड. रत्नमाला साळुंके-माने अशी त्यांची नावे आहेत.
नक्की वाचा - NEET Student death : 40 मिनिटं Video कॉलवर बोलला, NEET च्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने वडिलांना धक्का!
ही घटना काल सायंकाळी सुमारे 6.30 वाजता पडेगावजवळ घडली. माने दाम्पत्य रस्ता ओलांडत असताना नगरनाक्याच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना चिरडले. अपघातानंतर कारचालक पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
मूळ धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथील डॉ. रामराव माने हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात 1980 ते 2024 या काळात कार्यरत होते. त्यांनी अधिसभा आणि व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली होती. विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्र उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रासह सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. माने दाम्पत्याचे पार्थिव रविवारी त्यांच्या मूळगावी रुईभर (धाराशिव) येथे नेण्यात येणार असून, सायंकाळी 4.30 वाजता अंत्यसंस्कार पार पडतील. या दुर्दैवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.