गुंतवणुकीवर अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून आणि नंतर अश्लील फोटोंच्या जोरावर ब्लॅकमेल करून म्हाडाच्या (MHADA) एका 62 वर्षीय वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 4 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 'काव्या शर्मा' नावाची महिला आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने पतपेढीतून 3 कोटी 95 लाखांचे कर्ज काढले होते. हे कर्ज घेऊन त्यांनी गुंतवणूक केली होती. प्रचंड मोठ्या परताव्याच्या आमिषाला भुलून त्याने ही गुंतवणूक केली होती. या निवृत्त अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा: वॉर्डबॉय बनला बोगस 'डॉक्टर'! चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू
'काव्या' ने भुलवले
पीडित तक्रारदार हा म्हाडाचा निवृत्त अभियंता आहे. 17 जुलै 2025 रोजी त्यांना काव्या शर्मा नावाच्या महिलेचा व्हॉट्सॲप कॉल आला. तिने त्यांच्याशी मैत्री केली आणि त्यांना 'इंटरनॅशनल ट्रेडिंग स्कीम'मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वासात घेऊन आरोपींनी पीडित अधिकाऱ्याकडून जुलै 2025 ते जानेवारी 2026 या सहा महिन्यांच्या काळात वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने तब्बल 4 कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले. जेव्हा अधिकाऱ्याने आपली गुंतवलेली रक्कम आणि त्यावर झालेला नफा परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा काव्या शर्माने पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि त्यांना अश्लील मेसेज तसेच फोटो पाठवण्यास सुरुवात केली. "पैसे परत हवे असतील तर तुला तुझे नग्न फोटो पाठवावे लागतील," अशी अट या महिलेने घातली. मानसिक दडपणाखाली येऊन पीडित अधिकाऱ्याने काही फोटो पाठवले, जे त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरले.
नक्की वाचा: ठाणे-डोंबिवलीतील मानकोली उड्डाणपुलावर नागरिकांच्या जीवाशी खेळ; भाजप नेत्याने शेअर केला Video
ब्लॅकमेलिंगला सुरूवात
25 जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीने पीडिताला फोन केला. त्याने आपण काव्या शर्माचे काका असल्याचे सांगितले. निवृत्त अधिकाऱ्याने 'काव्या' ला पाठवलेल्या फोटोंच्याआधारे बलात्कार आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी त्याने दिली. हे प्रकरण मिटवण्यासाठी (Settle करण्यासाठी) आरोपींनी आणखी 2 कोटी रुपयांची मागणी केली. वारंवार होणाऱ्या या त्रासाला आणि आर्थिक लुटीला कंटाळून अखेर पीडित अधिकाऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि आपली तक्रार नोंदवली. TOI ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world