Dombivli News: सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भागात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधम पुजाऱ्याने अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत टिळकनगर पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, गोग्रास वाडी परिसरात घरोघरी जाऊन पूजा अर्चा करणाऱ्या हरीष भावे या पुजाऱ्याने हे निंदनीय कृत्य केले आहे. पीडित चिमुरडीचे आई आणि वडील दोघेही कामानिमित्त घराबाहेर असतात, याचाच गैरफायदा आरोपीने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी हरीष भावे हा पीडित कुटुंबाच्या घराशेजारीच राहत होता, त्यामुळे त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. या ओळखीचा फायदा घेत त्याने या चिमुरडीवर अतिप्रसंग केला.
( नक्की वाचा : Pune News :आळंदीत क्रूरतेचा कळस! 79 वर्षांच्या आजीची डोक्यात वार करून हत्या, तर 6 वर्षांच्या चिमुरडीला...)
कसा उघड झाला प्रकार?
पीडित चिमुरडीने तिच्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार धीर एकवटून आपल्या आई-वडिलांना सांगितला. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत घडलेला हा प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी कोणताही उशीर न करता आपल मुलीला सोबत घेऊन टिळकनगर पोलीस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला आणि आरोपी हरीष भावे याला अटक केली आहे.
( नक्की वाचा : Dombivli: जामिनावर सुटला अन् थेट जत्रेत पिस्तूल काढून रिल बनवलं; डोंबिवलीच्या रिलस्टारचा पोलिसांनी उतरवला माज )
डोंबिवलीतील गुन्हेगारीने नागरिक चिंतेत
तीन रिक्षाचालकांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच, आता पाच वर्षांच्या चिमुरडीसोबत घडलेल्या या घटनेमुळे डोंबिवलीत नक्की चाललंय काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एका पुजाऱ्यानेच अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.