Mira-Bhayander News : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथक–०१ आणि गुन्हे शाखा यांनी संयुक्त रित्या मोठी कारवाई करत राजस्थानमधील झुनझुनू येथे एमडी ड्रग्स तयार करणारी फॅक्टरी उघडकीस आणली आहे. या कारवाईत सुमारे १० किलो एमडी ड्रग्स, प्री-करसर रसायने तसेच अत्याधुनिक साधनसामुग्रीसह अंदाजे १०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काशिगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्तीदरम्यान ४ ऑक्टोबर रोजी संशयावरून सहा इसमांची झडती घेण्यात आली. त्यावेळी ५०१.६ ग्रॅम एमडी ड्रग्स (किंमत सुमारे १ कोटी रुपये), ८ मोबाईल, ४ मोटारसायकली असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. मात्र या तपासात पुढे आणखी आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेल्या २० लाख रुपयांच्या दोन चारचाकी, एक मोटारसायकल आणि ६ मोबाईल जप्त करण्यात आले.
आंतरराज्य अमली पदार्थ रॅकेटला मोठा धक्का
काशिगाव पोलीस ठाणे हद्दीत पकडलेल्या ड्रग्स प्रकरणातील पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक राजस्थानला रवाना झाले. १२ डिसेंबर रोजी झुनझुनू येथे आरोपी अनिल विजयपाल सिहाग आणि एमडी ड्रग्स बनविणारी फॅक्टरी सापडली. या फॅक्टरीत एमडी ड्रग्स तयार करण्यासाठी वापरली जाणारी फ्लास्क, मिक्सर, ड्रायर मशीन, वजन काटे, फिल्टर्स, हँड ग्लोव्हज आदी साधनसामुग्री मोठ्या प्रमाणात आढळून आली. या यशस्वी कारवाईमुळे आंतरराज्य अमली पदार्थ रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांची मोठी कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक–०१ व ०२ तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. या कारवाईत अमली पदार्थ विरोधी कक्ष ०१ चे प्रभारी पोलीस निरीक्षक समीर शेख, पोलीस उपनिरीक्षक निखील चव्हाण, पवन पाटील आणि प्रदीप टक्के, हवालदार सचिन घेरे, विनोद आवळे व महेश वेल्हे, पोलीस अंमलदार प्रतिक गोडगे तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, संग्राम गायवाड, सुधीर नरळे, पोअं राजकुमार गायकवाड व अजित मेड सर्व नेमणुक अमली पदार्थ विरोधी कक्ष ०२ तसेच सपोउपनि संतोष चव्हाण, नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.