Mira Bhayandar: भाजपा नगरसेवकावर महिलेचा अत्याचाराचा आरोप; नेमकं प्रकरण काय? मीरा-भाईंदरमध्ये चर्चांना उधाण

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमधील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mira Bhayandar News : या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
मीरा भाईंदर:


रमेश शर्मा, प्रतिनिधी 

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.शहरातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने लावलेल्या गंभीर आरोपांनंतर मीरा रोड पोलीस ठाण्यात ही नोंद करण्यात आली आहे. मात्र, संबंधित नगरसेवकाच्या तक्रारीवरून त्याच महिलेवर खंडणी मागितल्याचा गुन्हा नवघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. 

काय आहे प्रकरण?

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची आणि लक्ष्मण जंगम यांची ओळख एका सार्वजनिक कार्यक्रमात झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमसंबंधात झाले. आरोपीने जुलै 2022 मध्ये महिलेला मीरा रोड पूर्व येथील आपल्या कार्यालयात बोलावले आणि लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप महिलेने केला आहे. यानंतर कार्यालय, लॉज आणि इतर विविध ठिकाणी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Advertisement

महिलेने तक्रारीत पुढे  म्हंटले आहे की, तिने जेव्हा या कृत्याला विरोध केला, तेव्हा तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देण्यात आली. कोठेही वाच्यता केल्यास बघून घेण्याची भीती घातल्यामुळे ही महिला दडपणाखाली होती. अखेर तिने मीरा रोड पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. महिलेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 69 आणि 351(2) अंतर्गत लक्ष्मण जंगम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये सैराटची पुनरावृत्ती? आंतरजातीय लग्नावरुन काका संतापले,माय-लेकांवर घरात घुसून हल्ला! )

महिलेवर खंडणीचा गुन्हा

हे प्रकरण केवळ एका बाजूने मर्यादित राहिलेले नाही. नगरसेवक लक्ष्मण जंगम यांनीही संबंधित महिलेविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. महिलेने आपल्याकडे पैशांची मागणी करून खंडणी मागितल्याचा आरोप जंगम यांनी केला आहे. 

या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. एकाच वेळी नगरसेवकावर बलात्काराचा आणि तक्रारदार महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस आता दोन्ही बाजूंची कसून चौकशी करत आहेत.


( नक्की वाचा : Pune News: हिंजवडीत नाशिक प्रकरणाची पुनरावृत्ती? IT कंपन्यांमधील 'त्या' धक्कादायक प्रकाराची थेट सरकारकडून दखल )

राजकीय वर्तुळात पडसाद

सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकावर अशा प्रकारे गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांकडून संबंधित नगरसेवकावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. मीरा रोड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, कार्यालय आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणातील सत्य शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Advertisement
Topics mentioned in this article