प्रतिनिधी , सूरज कसबे
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरात एका पाळीव श्वानाला (Dog Killed) त्याच्याच मालकाने झाडाला दोरी बांधून फासावर लटकवून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पौंड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पिरंगुटच्या निकटेवस्ती परिसरामध्ये वास्तव्यास असलेल्या जगताप कुटुंबीयांकडे हा लॅब्राडोर जातीचा श्वान गेल्या 7 ते 8 वर्षांपासून होता. काल श्वानाच्या मालकाने मिशन पॉसिबल फाउंडेशन या संस्थेच्या पद्मिनी पिटर स्टंप यांना संपर्क केला.
आम्हाला हा श्वान सांभाळायचा नाही, तुम्ही त्याला घेऊन जा... असं जगताप यांनी सांगितलं. श्वानाला घेण्यासाठी रुग्णवाहिका पाठवत असल्याचं पद्मिनी यांनी सांगितलं. काही वेळाने पुन्हा मालकाने पद्मिनींना कॉल केला. तुम्ही येऊ नका मी माझ्या श्वानाला मारून टाकल्याचं सांगितलं. त्याचे फोटो सुद्धा त्यांनी पद्मिनींना पाठवले. विकृत बुद्धीच्या या मालकाच्या कृतीनं पद्मिनी संतापल्या. त्यांनी या संदर्भात पौंड पोलिसात श्वान मालक आणि एका महिलेच्या विरोधात पाळीव प्राण्याची क्रूरतेने हत्या केल्याबद्दल तक्रार दिली.
नक्की वाचा - हिच 'लायकी'; फरार गुन्हेगारांवर 5 रुपयांचं बक्षीस, दबंग अधिकाऱ्याची हटके कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून पौंड पोलिसांनी श्वान मालक ओमकार जगताप आणि एका महिलेच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 325 सह प्राणी क्रूरता अधिनियम कायदा 1960 च्या कलम 11 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. श्वानाला कोणताही आजार नव्हता, तरी मालकाने असं कृत्य का केलं याबाबतच तपास पौंड पोलीस करत आहे. दरम्यान हा सर्व प्रकार गंभीर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आणि प्राणीप्रेमी आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेतील आरोपींवर पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.