'तुमच्या लाडक्या बहिणीचा मृत्यू झालाय', BMW हिट अँड रन प्रकरणातील पीडित पतीचा टाहो

BMW Hit and Run Case : आमच्यासाठी कुणीही नाही, अशी भावना या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेचे पती प्रदीप नखवा यांनी रडत-रडत व्यक्त केलीय. 

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

BMW Hit and Run Case : मुंबईतल्या वरळीमध्ये रविवारी झालेल्या BMW हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला (Mihir Shah) मंगळवारी अटक करण्यात आली आहे. पण, ज्या नवऱ्यानं आपल्या पत्नीला कारच्या चाकाखाली चिरडताना पाहिलंय, ज्या मुलीनं तिच्या आईचा हॉस्पिटलमध्ये मृतदेह पाहिलाय त्यांचं दु:ख कमी होणारं नाहीय. त्यानं माझ्या डोळ्यासमोर तिला चाकाखाली चिरडत नेलं. आमच्यासाठी कुणीही नाही, अशी भावना या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेचे पती प्रदीप नखवा यांनी रडत-रडत व्यक्त केलीय. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आम्हाला न्याय कोण देणार?

'आम्ही गरीब आहोत. आम्हाला पाठिंबा द्यायला, आम्हाला न्याय मिळवून द्यायला कोण आहे? आज त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. उद्या त्याला कोर्टात हजर करतील. त्यानंतर त्याला जामीन मिळेल. त्याची सूटका होईल आणि केस सुरुच राहील. हा खटला लढण्यासाठी आम्ही पैसे कुठून आणणार? आम्ही वकील कसा देणार? आमच्यासाठी तिथं कोण आहे?

राजकारण्यांना आमची पर्वा नाही. तो (आरोपी) राजकारण्याचा मुलगा आहे. त्याच्याकडं पैसे आहेत. आम्ही कुणीच नाहीत, अशी भावना नखवा यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेत नखवा देखील जखमी झाले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते राजेश शहाचा मिहीर मुलगा आहे. राजेश शहा पालघरमधील शिवसेना पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यावरही मुलाला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे. 

( नक्की वाचा : BMW Hit And Run : शिवसेना नेत्याच्या मुलाभोवतालचा फास आवळला, बिलमधून मोठा खुलासा )
 

'त्याला (मिहीर शहा) अपघातानंतर तीन दिवसांनी अटक करण्यात आलं आहे. त्यानं काहीच केलं नव्हतं तर तो का लपला होता? त्यानं दारु किंवा ड्रग्ज घेतले नव्हते तर तो का पळून गेला? कारनं धडक दिल्यानंतर तो गायब होता. त्यानं नंबर प्लेट तोडली आणि लपून बसला. का? तीन दिवसानंतर त्याच्या रक्तात अल्कोहलचा कोणताही अंश शिल्लक नसेल,' असं नखवा यांनी सांगितलं.  

वरळीच्या कोळीवाड्यातील रहिवाशी असलेले हे दोघे जण ससून डॉकहून ताजे माशे घेऊन परतत असताना हा अपघात झालाय. भरधाव कारने दोघांना धडक देत काही अंतरावर फरफटत नेलं. मात्र पती कारच्या बोनेटवर असल्याने फार दुखापत झाली नाही, तर पत्नी कावेरी यांचा यामध्ये मृत्यू झाला.

Advertisement

( नक्की वाचा : BMW Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक )
 

फक्त खूर्चीची पर्वा

या दुर्घटनेनंतर कोणत्याही राजकारण्यांनी आमची चौकशी का केली नाही? असा प्रश्न नखवा यांनी विचारला. 'देवेंद्र फडणवीस आम्हाला भेटले का? नेमकं काय झालं हे समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे आमच्या घरी आले का? अजित पवार कुठं आहेत? त्यांना फक्त खूर्चीची पर्वा आहे. त्यांना सत्तेनं आंधळं केलंय.'

'त्यांना फक्त मतांसाठी आमची आठवण होते. त्यानंतर ते आम्हाला विसरुन जातात. लोकं त्यांच्यासाठी कचरा आहेत. ते 'लाडकी बहीण' योजन्ेबाबत बोलतायत. तुमच्या लाडक्या बहिणीचा  मृत्यू झालाय,' अशी मन सुन्न करणारी प्रतिक्रिया प्रदीप नखवा यांनी व्यक्त केलीय.