जाहिरात

BMW Hit And Run : शिवसेना नेत्याच्या मुलाभोवतालचा फास आवळला, बिलमधून मोठा खुलासा

BMW Hit and Run Case : आरोपीनं BMW कारनं या दम्पत्याला उडवण्यापूर्वी काही तास आधीचं एक बिल व्हायरल झालं आहे.

BMW Hit And Run : शिवसेना नेत्याच्या मुलाभोवतालचा फास आवळला, बिलमधून मोठा खुलासा
BMW Hit And Run Case
मुंबई:

BMW Hit and Run Case : पुण्यातील अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन करुन भरधाव वेगानं पोर्शे कार चालवल्याची घटना ताजी आहे. त्यापाठोपाठ मुंबईतल्या वरळीमध्ये भरधाव कारनं कोळी दाम्पत्याला उडवल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे झालेल्या या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून , पती जखमी झाला आहे.  मिहीर शहा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मिहीर हा शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. आरोपीनं BMW कारनं या दम्पत्याला उडवण्यापूर्वी काही तास आधीचं एक बिल व्हायरल झालं आहे. 18,730 रुपयाचं हे दारुचं बिल असल्याची माहिती तपासात उघड झालीय. या घटनेनंतर मिहीर फरार असून त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची 6 पथकं स्थापन करण्यात आली आहेत. 

मिहीर शहाचे वडील राजेश आणि त्याचा ड्रायव्हरला पोलिसांनी यापूर्वीच अटक केलीय. या दोघांवर मिहीरला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे तपासातील माहिती?

या प्रकरणातील तपासामधून उघड झालेल्या माहितीनुसार मिहीर शहा जुहूमधील बारमध्ये शनिवारी रात्री उशीरापर्यंत मद्यप्राशन करत होता. त्यानंतर त्याच्या ड्रायव्हरनं तिथून त्याला BMW कारनं पिक केले. वरळीमध्ये हा अपघात झाला त्यावेळी मिहीर कार चालवत होता, असा आरोप आहे. मिहीर चालवत असलेल्या BMW नं कावेरी नखवा आणि प्रदीप नखवा या दाम्पत्याला उडवले. कोळीवाड्यातील रहिवाशी असलेले हे दोघे जण ससून डॉकहून ताजे माशे घेऊन परतत असताना हा अपघात झालाय. भरधाव कारने दोघांना धडक देत काही अंतरावर फरफटत नेलं. मात्र पती कारच्या बोनेटवर असल्याने फार दुखापत झाली नाही.पण, पत्नी कावेरी यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला.

हा अपघात झाला ते वाहन मिहीर शहाच्या नावानं रजिस्टर आहे. पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिहीरनं अपघातानंतर त्याच्या वडिलांना फोन केला होता. त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ आहे. या प्रकरणातील पीडित दाम्पत्याला दोन मुलं आहेत. या अपघातानंतर जखमी प्रदीप यांना माध्यमांसमोर बोलताना अश्रू अनावर झाले. 'मला दोन मुलं आहेत. मी आता काय करु? ती मोठी माणसं आहेत. त्यांना कुणी काही करणार नाही. आम्हाला त्रास सहन करावा लागेल,' अशी भावना प्रदीप यांनी व्यक्त केली होती.

ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे वाढल्याने मुख्यमंत्री संतापले, महापालिका तसेच पोलीस आयुक्तांना दिले महत्त्वाचे आदेश
 


मुख्यमंत्र्यांनी दिली सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतल्याचे पाहायला मिळत आहे.  मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक,वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचनाही मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com